इंग्रजी की मराठी, घराघरांत वाटाघाटी

संजय जगताप
शुक्रवार, 2 जून 2017

शाळांचे भूत पालकांच्या मानगुटीवर; समुपदेशनाची आवश्‍यकता

शाळांचे भूत पालकांच्या मानगुटीवर; समुपदेशनाची आवश्‍यकता

मायणी - जून महिना सुरू झाला अन्‌ बालकांसह पालकांना शाळांचे वेध लागले. आपल्या सोनुल्याला इंग्रजी की मराठी माध्यमाच्या शाळेत घालायचे, याची चर्चा घराघरांत फेर धरू लागली आहे. त्यातच विविध माध्यमांच्या शाळांनी केलेल्या जाहिरातींचे भूत पालकांच्या मानगुटीवर बसल्यामुळे, पालकही गोंधळून गेले आहेत. मराठी की इंग्रजी माध्यम निवडायचे, असा यक्षप्रश्न सध्या पालकांना सतावतो आहे. त्यांना तज्ज्ञांनी विविध माध्यमातून समुपदेशन करण्याची आवश्‍यकता व्यक्त होत आहे. 
जून महिना सुरू होताच सर्वांना शाळेचे स्मरण होऊ लागलेले आहे. नवीन कपडे, नवीन दप्तर, नवे मित्र, नवा वर्ग, बेंचही नवे. शिक्षक, अभ्यास, गंमतीजमती अशा विविध गोष्टींची स्वप्ने पडू लागली आहेत. दीर्घ सुटीवर गेलेल्या शाळकऱ्यांनाही आता शाळा सुरू होण्याची आस लागली आहे. 

तर उन्हाळी सुटीत मुलांच्या विविध खोड्या, गोंधळ, त्रासदायक वर्तणूक आदी लीलयांनी त्रस्त झालेले पालकही शाळा सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत. तर शाळांनीही अधिकाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश व्हावेत, यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. मोठ्या प्रमाणात जाहिराती केल्या आहेत. गृहभेटी दिल्या आहेत. सुटीच्या काळातही शाळा प्रशासन व संस्थाचालकांनी शिक्षकांवर पालकभेटी, गृहभेटींची जबाबदारी दिली होती.

त्यानुसार सर्व शाळांचे प्रतिनिधी घराघरांत पोचले आहेत. विविध उपक्रम राबवणारी आमचीच शाळा कशी चांगली आहे, याचे वारंवार पाढे वाचलेले आहेत. शिवाय गावांत, परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी मोठमोठे डिजिटल फलक लावले आहेत. त्याद्वारे शाळेतील उपक्रम, भौतिक सोयी-सुविधा, शाळेची यशस्वी घोडदौड, मिळालेली पारितोषिके, पदके अशा सर्वांगीण माहितीची आकर्षक जाहिरात करण्यात आली आहे. त्या विविध जाहिरातींची चर्चाही होत आहे. 

दरम्यान, घराघरांत सध्या शाळा प्रवेशाचा विषय चर्चिला जाऊ लागला आहे. त्यासाठी गाव, परिसर, जिल्ह्यातील विविध नामांकित शाळांसह निवासी शाळांचीही पालक बारकाईने चौकशी करीत आहेत. त्रयस्थांकडून माहिती घेत आहेत. त्यामधून आपल्या खिशाला परवडणारी शाळा कोणती, असा विचार सर्वप्रथम होत आहे. मात्र, मराठी की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालायचे, याबाबत मात्र पालकांत संभ्रम अनुभवास येत आहे. बहुतांशी शाळांत शिक्षकसंख्या पुरेशी नाही. प्रशिक्षित शिक्षक नाहीत. गुणवत्ता नाही. भौतिक सोयी-सुविधा नाहीत. तरीही अनेक शाळांना आयएसओ मानांकन मिळाले आहे. याकडेही पालक जागरुकतेने पाहत आहेत. खासगी शाळांच्या फीचा प्रश्नही पालकांच्या चर्चेचा विषय झालेला आहे. त्यातच कुटुंबातील सर्वांचे मराठी की इंग्रजी माध्यमाची शाळा निवडायची, यावर एकमत होत नसल्याने घराघरांत त्याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यातून वादही होत आहेत. पालकांच्या त्या साधक-बाधक चर्चेकडे, वाद-संवादाकडे लहानग्यांचे मात्र एक ना दोन ! त्यांच्या अंतर्मनाचा ठाव घेणार कोण ? दरम्यान, शाळा व शिक्षणाच्या जंजाळात भरकटून दिशाहीन झालेल्या पालकांना तज्ज्ञांकडून विविध माध्यमातून समुपदेशन करण्याची आवश्‍यकता व्यक्त होत आहे.

Web Title: mayani satara news school admission english or marathi