राजकीय लाभासाठीच टेंभुचे भिजत घोंगडे ?

Water
Water

मायणी - टेंभु सिंचन योजनेच्या पाण्याने मायणी तलाव भरुन घेण्याच्या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली. टंचाईतुन निधीची तरतुदही करण्यात आली. मात्र कामांस अद्याप मुहुर्त सापडेना. त्यामुळे राजकीय लाभासाठीच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकरांकडुन आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत योजनेचे भिजत घोंगडे ठेवण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परिणामी यंदाही मायणी तलाव कोरडाच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. 

सांगली व सोलापुर जिल्ह्यातील विविध तालुक्यांना वरदान ठऱलेल्या टेंभु योजनेचा कालवा खटाव तालुक्याच्या दक्षीण सीमेवरुन जातो. तरीही तालुक्याचा सीमाभाग तहानलेला आहे. मायणी व कलेढोण परिसरातील विविध गावांना सिंचनासाठी टेंभूचे पाणी मिळावे. ही तेथील भुमीपुत्रांची वर्षानुवर्षांची मागणी आहे. मात्र पाण्याचे वाटप आधीच झाल्याने टेंभुचे पाणी 
कोणत्याही स्थितीत इतरत्र वळविता येणार नसल्याची भुमिका आघाडी सरकार व प्रशासनाने घेतली होती.

कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष राहिलेले माजी आमदार भाऊसाहेब गुदगे, समाजभुषण हणमंतराव साळुंखे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, अॅड. शरश्चंद्र भोसले, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे आदी नेत्यांनी वारंवार पाठपुरावा करुनही टेंभुचे पाणी वळविण्यात यश आले नाही. 

दरम्यान, भाजप सरकारने धोरणांत लवचिकपणा आणत सिंचनाऐवजी टंचाई काळात पिण्यासाठी पाणी देण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यासाठी डॉ. येळगावकरांनी पाठपुरावा केला. दरम्यान, मायणी ग्रामपंचायतीची 
निवडणुक लागली. सुरेंद्र गुदगेंच्या नेतृत्त्वाखालील ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी येळगावकरांनी लोकांना आश्वस्त केले. सत्ता येताच कायमचा पाणीप्रश्न संपवणार असुन त्यासाठी मायणी तलाव टेंभुच्या पाण्याने भरुन घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सत्ताबदलही झाला. मात्र सहा महीने उलटुन गेले तरी टेंभुच्या पाण्याचे भिजत घोंगडे पडले आहे.

योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. टंचाई निधीतुन आर्थिक तरतुदही करण्यात आली आहे. त्याचे पुरावेही डॉ. येळगावकर वारंवार लोकांच्या निदर्शनास आणत आहेत. मात्र, प्रत्यक्ष कामास अद्याप मुहुर्त सापडेना. आमक्या मंत्र्याची तारीख मिळेना, या उन्हाळ्यात शंभर टक्के पाणी येणारच, येत्या पंधरवड्यात भुमीपुजन निश्चित होईल आणि कामास लगेच सुरवात होऊन पाणी तलावात येणारच. असे छातीठोकपणे सांगणारे कार्यकर्ते सद्या मूग गिळुन गप्प बसले आहेत.

तालुक्यातील टंचाईग्रस्त चाळीस गावांमध्ये मायणीचाही समावेश आहे. तेथील उपनगरांत तीव्र पाणीटंचाई आहे. माळीनगर येथे प्रतीवर्षी मार्च 
मध्येच टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होतो. मात्र सध्या तीव्र टंचाई असुनही तेथे टँकर सुरू झालेला नाही. दरम्यान, टंचाई काळातच टेंभुचे पाणी तलावात सोडता येणार असल्याने आणि अद्याप त्याअनुषंगाने कामाला सुरवातच झाली नसल्याने, मे अखेर तलावात पाणी येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आधीच तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे 
झाल्याने पावसाचे पाणी तलावापर्यंत पोचतच नाही. परिणामी गेल्या कित्येक वर्षापासुन तलाव कोरडा आहे. दरम्यान, आताच टेंभुच्या पाण्याने माय़णी तलाव भरुन घेतला तर आगामी विधानसभा निवडणुकीपर्य़ंत लोकांना आपल्या कामाचा विसर पडेल. त्याचा राजकीय लाभावर परिणाम होईल. म्हणुनच डॉ. येळगावकरांकडुन टेंभुच्या पाण्याचे भिजत घोंगडे ठेवले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे. काहीही झाले तरी डॉ. येळगांवकर या उन्हाळ्यात तलावात पाणी आणणारच. असा ठाम विश्वास व्यक्त करणाऱे शेतकऱी, नागरिक व कार्यकर्तेही आता नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. नाराजी दूर करण्यासाठी डॉ. येळगावकरांकडुन कोणती पाऊले उचलली जातात. हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

भाजप सरकार थापाडे व बोलघेवडे आहे. कामाचे नुसते गाजर दाखविण्यात येते. योजनेस मंजुरी, आर्थिक तरतुद झाली 
असल्यास आतापर्यंत तलावात पाणी यायलाच हवे होते. 
- दादासाहेब कचरे ( माजी उपसरपंच, मायणी )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com