सोलापूरात काँग्रेसला धक्का; दोन आमदारांसह महापौर सोडणार पक्ष

तात्या लांडगे
रविवार, 4 ऑगस्ट 2019

लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या त्सुनामीचा अंदाज घेत कॉंग्रेसचे आमदार भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर अलका राठोड, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील मोदींच्या त्सुनामीचा अंदाज घेत कॉंग्रेसचे आमदार भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर अलका राठोड, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

भाजप, शिवसेना व वंचित बहूजन आघाडीकडून त्यांना ऑफरही मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, आपण कोणत्या पक्षातून विजयी होणार याचे नियोजन त्यांनी सुरु केल्याची चर्चा आहे.

विधानसभा निवडणुकीत संधी मिळावी म्हणून कॉंग्रेसच्या माजी महापौर अलका राठोड यांनी शहर मध्य अथवा दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, शहर मध्यमधून कॉंग्रेसच्या स्टॅण्डींग आमदार प्रणिती शिंदे यांनी तर दक्षिण सोलापूर मतदारसंघातून शिवसेना अथवा भाजपकडून माजी आमदार दिलीप माने यांनी तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. त्यामुळे अलका राठोड यांनी आता वंचित बहूजन आघाडीसह अन्य पर्यायाचा शोध सुरु केला आहे. त्यामुळे बंजारा समाजाचा या निवडणुकीत कॉंग्रेसपासून दुरावणार, असेच चिन्हे दिसू लागली आहेत. 

सुशिलकुमार शिंदे गप्प का...
लोकसभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने माजी केंद्रीयमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी शहर-जिल्ह्यातील बदलत्या राजकीय स्थितीकडे कानाडोळा केल्याची चर्चा आहे. पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर अलका राठोड, कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी अन्य पक्षांची वाट धरली आहे.

सोलापूर बाजार समितीत कॉंग्रेसचे बहूमत असतानाही सभापतीपद भाजपकडे गेल्याने नाराज झालेले बाळासाहेब शेळके यांच्यासह अन्य कोणत्याही नेत्यांची मनधरणी न केल्याने त्यांनी आता पर्याय शोधायला सुरुवात केली आहे. तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरुन मोची व मुस्लिम समाज अस्वस्थ आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अंतर्गत वादामुळे कॉंग्रेसपुढे मोठे आव्हान उभे असतानाही शिंदे यांची हालचालच दिसत नसल्याचा सूर निघतोय. 

आमदार प्रणिती शिंदेंमुळेच कॉंग्रेसची लागली वाट
लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत सत्ताधारी असतानाही कॉंग्रेसला दारुण पराभव पत्कारावा लागला. विजयाची खात्री असतानाही अनेकांना पराभूत व्हावे लागले. महापालिकेची सत्ता जाण्यासाठी आमदार प्रणिती शिंदेच जाबाबदार असल्याचा सूर पराभूत उमेदवारांमधून निघाला. तेव्हापासून अनेकांनी आमदार शिंदे यांच्यापासून फारकत घेतली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही प्रणिती शिंदे यांच्या वादग्रस्त वक्‍तव्याचा कॉंग्रेसला फटका बसल्याची चर्चा सुरु झाली. आता त्यांच्याच शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मोची व मुस्लिम, बंजारा समाजाने उमेदवारी मागितल्याने त्यांची वाट खडतर होत असल्याचे चित्र दिसत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mayor and two Mla will leave congress party in solapur