महापौर-उपमहापौर निवडी आज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

सांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०) शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकराला सभा होईल.

सांगली - महापालिकेतील तेराव्या आणि भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या महापौर संगीता खोत, तर उपमहापौरपदी धीरज सूर्यवंशी यांच्या निवडीवर उद्या (ता. २०) शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी साडेअकराला सभा होईल.

महापालिकेच्या स्थापनेनंतर काँग्रेसने दिवंगत नेते मदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सन १९९८ मध्ये सत्ता काबीज केली. सन २००३ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीतही मदन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळवून दिली. सन २००८ मध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीने सत्ता मिळवली; तर सन २०१३ मध्ये पुन्हा मदन पाटील यांनी काँग्रेसकडे सत्ता खेचली. पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत मात्र भाजपने प्रथमच महापालिकेवर झेंडा फडकावून एकहाती सत्ता मिळवली.
महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण अडीच वर्षांसाठी आहे.

भाजपकडून संगीता खोत, सविता मदने, कल्पना कोळेकर, गीता सुतार, अनारकली कुरणे, नसीम नाईक, ऊर्मिला बेलवलकर यांच्यात चुरस होती. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापौर, उपमहापौर निवडीचे अधिकार स्थानिक कोअर कमिटीला दिले होते. या समितीच्या बैठकीतील चर्चेनुसार महापौरपद मिरजेला अर्थात संगीता खोत यांना देण्याचा निर्णय झाला. सांगलीला उपमहापौरपद आणि सभागृह नेतेपद देण्याचे ठरले.

भाजपकडून महापौरपदासाठी खोत यांचे नाव निश्‍चित आहे. सविता मदने यांनाही अर्ज भरण्यास सांगण्यात आले. उपमहापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी निश्‍चित आहेत. त्यांच्यासह पांडुरंग कोरे यांनीही अर्ज दाखल केला आहे. भाजपचे सभागृह नेते म्हणून युवराज बावडेकर यांची निवड करण्यात आली. काँग्रेसकडून महापौरपदासाठी वर्षा निंबाळकर, तर उपमहापौरपदासाठी स्वाती पारधी यांनी अर्ज दाखल केला. 

महापालिकेत सत्ता आल्यानंतर भाजपच्या पहिला महिला महापौर म्हणून संगीता खोत व उपमहापौर धीरज सूर्यवंशी यांची निवड शंभर टक्के निश्‍चित आहे. उद्याच्या सभेत केवळ औपचारिकता बाकी आहे.

निवडीचा आनंद साधेपणाने
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनामुळे देशभर दुखवटा पाळला जात आहे. त्याच काळात महापौर व उपमहापौर निवड होत असल्याने निवडीचा आनंद साधेपणाने करण्याचा निर्णय कोअर कमिटीने घेतला. निवडीवेळी हारतुरे, गुच्छ आणू नयेत. गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी किंवा मिरवणुकीचा जल्लोष करू नये, असे आवाहनही कोअर कमिटीने केले आहे.

गोवा टू सांगली
महापौर निवडीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या ४२ नगरसेवकांपैकी तीन-चार जणांचा अपवाद वगळता सर्वजण गुरुवारी (ता. १६) गोव्याला एकत्र रवाना झाले होते. माजी आमदार दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक एकत्र आहेत. नगरसेवक फुटले जाऊ नयेत म्हणून त्यांच्यावर करडी नजर आहे. उद्या सकाळी सर्वजण सांगलीत येतील.

Web Title: Mayor Deputy Mayor Selection Politics