नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडी जल्लोषात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूरच्या पहिल्या नगराध्यक्षपदी अनुक्रमे साधना कांबळे, आकांक्षा जाधव, अलिअकबर पिरजादे यांची निवड झाली. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत परावर्तित झालेल्या या तिन्ही शहरांचा कारभार आता या तिघांच्या हाती आला असून, त्यांच्या व उनगराध्यक्षांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला...

नगराध्यक्षपदी साधना कांबळे

जिल्ह्यात नव्यानेच स्थापन झालेल्या कवठेमहांकाळ, कडेगाव आणि खानापूरच्या पहिल्या नगराध्यक्षपदी अनुक्रमे साधना कांबळे, आकांक्षा जाधव, अलिअकबर पिरजादे यांची निवड झाली. ग्रामपंचायतीतून नगरपंचायतीत परावर्तित झालेल्या या तिन्ही शहरांचा कारभार आता या तिघांच्या हाती आला असून, त्यांच्या व उनगराध्यक्षांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला...

नगराध्यक्षपदी साधना कांबळे

कवठेमहांकाळ - येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडीच्या साधना कांबळे, तर उपनगराध्यक्षपदावर स्वाती पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. एकीकडे दोनच दिवसांपूर्वी नगराध्यक्षपदी साधना कांबळे यांचा मार्ग मोकळा झाला होता. दरम्यान, आज उपनगराध्यक्षपदासाठी उत्सुकता शिगेला पोचली असताना याही पदावर स्वाती पाटील यांना संधी दिली आहे. एंकदरीतच कवठेमहांकाळ नगरपंचायतीचा कारभार आता महिलांकडे आला असून महिलाराज सुरू झाले आहे. 

निवडीनंतर नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षासह नगरसेवकांचा सत्कार माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच नगरपंचायतीच्या निवडणुकीत सतरांपैकी तेरा जागांवर स्वाभिमानी विकास आघाडीने विजय मिळविला, तर परिवर्तन आघाडीने चार जागा पटकाविल्या. गत काही दिवसांपासून शहराचा नगराध्यक्षपदाबाबत चर्चा सुरू असताना स्वाभिमानी आघाडीच्या साधना कांबळे यांना संधी देत मार्ग मोकळा केला होता.

कार्यक्रमानुसार निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, नायब तहसीलदार रूपाली रेडेकर यांनी प्रक्रिया राबविली. नगराध्यक्षपदासाठी साधना कांबळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी नगराध्यक्षांची निवड बिनविरोध जाहीर केली. उपनगराध्यक्षांसाठी स्वाभिमानी आघाडीने स्वाती पाटील, तर परिवर्तन आघाडीच्या वतीने विशाल वाघमारे यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, उपनगराध्यक्षपदाकरिता दोन अर्ज आल्याने माघार घेण्याच्या वेळेत परिवर्तनचे नगरसेवक विशाल वाघमारे यांनी अर्ज मागे घेतला. या वेळी उपनगराध्यक्षपदीही स्वाभिमानी आघाडीच्या स्वाती पाटील यांचा एकमेव अर्ज राहिल्याने तीही निवड बिनविरोध जाहीर झाली.

नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांचा प्रशासनाच्या वतीने वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला, तर आघाडीचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा बॅंकेचे संचालक गणपती सगरे, नगरसेवक गजानन कोठावळे, सुनील माळी, चंद्रशेखर सगरे, अय्याज मुल्ला यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी नूतन नगरसेवक,ग्रामस्थ, आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदी अलिअकबर पिरजादे 
खानापूर - येथील नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्या गटाचे अलिअकबर कमरुद्दीन पिरजादे यांनी मिळविला, तर आमदार अनिलराव बाबर गटाच्या स्वाती राजेंद्र टिंगरे पहिल्या उपनगराध्यक्ष झाल्या. येथील नगरपंचायतच्या पहिल्या निवडणुकीत तीनही पॅनेलला जवळपास समान जागांवर विजय मिळविता आल्याने त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. 

आज शेवटच्या दिवसापर्यंत नेमकी कोणाची युती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आज सुहास शिंदे आणि अनिलराव बाबर यांच्या दोन्ही गटानी एकत्र येत सत्ता स्थापन केली. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी निवडणुकीत अलिअकबर पिरजादे यांना ११ मते मिळाली. राजेंद्र माने यांना ५ मते मिळाली, तर गौरव भगत यांना एका मतावर समाधान मानावे लागले. उपनगराध्यक्ष निवडणुकीत स्वाती टिंगरे यांना ११ मते मिळाली, तर माने गटाच्या वैशाली हजारे यांना ५ मते मिळाली. एक मत तटस्थ राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी एस. डी. भोसले, सहायक अधिकारी म्हणून तहसीलदार कल्पना ढवळे यांनी काम पाहिले.

नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड, खानापूरचे मुख्याधिकारी अजयकुमार नश्‍टे उपस्थित होते. दरम्यान, अलिअकबर पिरजादे म्हणाले, ‘सर्वांच्या सहकार्याने नगरपंचायतचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाल्याने आनंद होत आहे. सुहासनाना शिंदे आणि शिवसेनेचे मार्गदर्शन घेऊन खानापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. सर्व सदस्यांना सोबत घेत नगरपंचायतचा कारभार करणार आहे.’’

नगराध्यक्षपदी आकांक्षा जाधव, उपनगराध्यक्षपदी साजीद पाटील

कडेगाव - कडेगाव नगरपंचायतीच्या पहिल्यांदा नगराध्यक्षा होण्याचा बहुमान काँग्रेसच्या आकांक्षा जाधव यांना, तर उपनगराध्यक्ष होण्याचा बहुमान काँग्रेसचे साजीद पाटील यांना मिळाला आहे. नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. 
मतदानामध्ये सात विरुद्ध दहा मतांनी आकांक्षा जाधव यांची नगराध्यक्षपदी, तर सात विरुद्ध दहा मतांनी साजीद पाटील यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. निवडीनंतर नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांची शहरांतून मिरवणूक काढण्यात आली तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्‍यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. तर भाजपने नगराध्यक्षपदाच्या निवडीवेळी चमत्कार घडविणार असा दावा केला होता, तो फोल ठरला.

उपनगराध्यक्षपदांसाठी काँग्रेसचे दिनकर जाधव, साजीद पाटील व सागर सूर्यवंशी या तिघांत चुरस होती. सुरवातीला दिनकर जाधव यांचे पारडे जड होते. परंतु तिघेही उपनगराध्यक्षपदांसाठी आग्रही असल्याने पक्षश्रेष्ठींनी याबाबत निर्णय राखून ठेवला होता. परंतु अंतिम क्षणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामहुसेन पाटील यांनी सुपुत्र साजीद पाटील यांचेसाठी राजकीय वजन वापरून आमदार डॉ. पतंगराव कदम यांचेसह पक्षश्रेष्ठीचे मत परिवर्तन केले. त्यामुळे उपनगराध्यक्षपदी साजीद पाटील यांचे नाव निश्‍चित झाले. 

उदयकुमार देशमुख यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदान घेऊन करावी, अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी तुषार ठोंबरे यांचेकडे केली. ती मान्य झाली नाही. त्यानंतर हात उंचावून मतदान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तुषार ठोंबरे यांनी, तर सहनिवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अर्चना शेटे, मुख्याधिकारी चरण कोल्हे यांनी काम पाहिले. दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा आमदार डॉ. पतंगराव कदम यांचा सत्कार केला. यावेळी सुरेश निर्मळ, गुलाम पाटील, विजय शिंदे यांचेसह काँग्रेसचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: mayor, dy. mayor selection