महापौर मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 17 जून 2018

सोलापूर : महापौरांच्या मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. पालकमंत्री व खासदारांना "बदल' अपेक्षित असल्याने सहकारमंत्री गोटात चिंता व्यक्त होत आहे. 

सोलापूर : महापौरांच्या मुदतवाढीचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलविण्यात आला आहे. पालकमंत्री व खासदारांना "बदल' अपेक्षित असल्याने सहकारमंत्री गोटात चिंता व्यक्त होत आहे. 

भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांच्या कारभाराचा आढावा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी श्रेष्ठींसमोर मांडला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यासह आठ महापालिकेतील महापौर बदलण्यावर नेत्यांमध्ये एकमत झाल्याची चर्चा आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासगर, ठाणे, नागपूर, अमरावती, अकोला आणि नाशिक या महापालिकांत खांदेपालट होऊ शकतो असे संकेत आहेत. सोलापूरचे नाव या यादीत नाही, तथापि खासदार शरद बनसोडे यांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल प्रदेश पातळीवरून घेतली जाऊ शकते. महापालिकांतील "कारभारी' बदलले, पण कारभार बदलला नसल्याचा अनुभव भाजप सत्ता असलेल्या सर्वच महापालिकेत येत आहे. सोलापुरात त्याची जास्त तीव्रता आहे. भाजपची सत्ता असलेल्या शहरांमधील कारभार अडचणीचा ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पदाधिकारी बदलून कारभार सुधारण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

फेरबदलात आक्रमक नगरसेविकेला संधी देण्याचे संकेत आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये श्रीकांचना यन्नम यांचे नाव आहे. त्या ज्येष्ठ असल्या तरी आक्रमक असल्याचे दिसून येत नाही. पक्षादेश पाळण्याकडे त्यांचा कल आहे. विरोधी पक्षनेते शिवसेनेचे महेश कोठे यांचे पुतणे तथा नगरसेवक देवेंद्र कोठे त्यांचे जावई आहेत. त्यामुळे यन्नम महापौर व्हाव्यात ही कोठे यांचीही इच्छा आहे. मात्र कोठे-यन्नम यांच्यातील नातेसंबंधच यन्नम यांना पदापासून दूर नेण्याचे कारण होऊ शकते. पद्मशाली समाजाला न्याय द्यायचा ठरला तर, यन्नम यांनाच संधी मिळेल. पण "आक्रमकता' हाच निकष ठेवला तर, बनशेट्टी यांनाच मुदतवाढ मिळू शकते. 

पक्षाचा आदेश सर्वांना मान्यच करावा लागतो. पक्ष जो आदेश देईल तो महापौरांना मान्य करावाच लागेल आणि तो आदेश त्याही मान्य करतील याची खात्री आहे. 
- विजय देशमुख, पालकमंत्री 

सव्वा वर्षांत दोन महापौर नियुक्त करण्याची कसलीही चर्चा झाली नाही. त्यामुळे मला बदलण्याबाबत घडामोडी होणारच नाहीत. मी पूर्ण अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण करेन. 
- शोभा बनशेट्टी, महापौर 
 

Web Title: Mayor extension of duration case in chief minister's court