सावध इच्छुकांचे लक्ष नगराध्यक्ष आरक्षणाकडे

गोरख चव्हाण
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

राजकीय वातावरण तापले - निवडणूक ठरणार जिल्हा परिषद, पंचायत समितीची रंगीत तालीम

राजकीय वातावरण तापले - निवडणूक ठरणार जिल्हा परिषद, पंचायत समितीची रंगीत तालीम

कवठेमहांकाळ - पहिल्या-वहिल्या नगरपंचायतीवर सत्ता मिळवण्यासाठी इच्छुक तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शिवसेना आदींसह सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचे जाहीर केले असले तरी निवडणुकीदरम्यान कोणाची आघाडी व कोण स्वतंत्र, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. स्थानिक नेत्यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची व आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीचे चित्र स्पष्ट करणारी ही निवडणूक असल्याने नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होईपर्यंत राजकीय पक्षांमधील इच्छुक सावध भूमिकेत असून सर्वांनी गुप्त बैठकांवर जोर लावला आहे. 

गत १६ मार्चला कवठेमहांकाळ ग्रामपचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाले. तदनंतर सतरा प्रभाग जाहीर होऊन प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आहे. यातच नगराध्यक्षांचे आरक्षण अद्यापपर्यंत जाहीर न झाल्याने प्रभागातून आऊट झालेल्या चेहऱ्यांच्या नजरा आता याकडे लागून राहिल्या आहेत. नगरपंचायतीची निवडणूक राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, आरपीआय व बसपाने स्वबळावर लढविण्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. तशी तयारीही सुरू केली आहे. मात्र, नगरपंचायतीच्या निवडणुकीत कोणाची आघाडी व कोणाच्यात बिघाडी होणार, याबाबतचे चित्र येत्या काही दिवसांत समजेल. गत काही दिवसांपासून कवठेमहांकाळ शहरात विविध कार्यक्रमांच्यानिमित्ताने राजकीय नेत्यांची उपस्थिती महत्त्वाची बनत चालली आहे.
नगरपंचायतीमध्ये सतरा प्रभाग निर्माण झाले असले तर प्रभागातून इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातच राष्टवादीच्या वतीने आमदार सुमन पाटील, महांकालीचे नेते विजय सगरे, तालुकाध्यक्ष नारायण पवार, युवकचे पदाधिकारी यांनी चर्चा सुरू केल्या आहेत. काँग्रेसचा नुकताच शहरातील पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम युवकचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, वैभव गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली आहे. एकीकडे दोन्ही पक्षांच्या वतीने तयारी सुरू असताना भाजपनेही जोरदार कामगिरी करण्यास सुरवात केली आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय पाटील यांनी शहराच्या व तालुक्‍याच्या विकासासाठी एकत्र या, असे आवाहन केले. यावेळी तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, दादासाहेब कोळेकर, मिलिंद कोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू आहे. एकीकडे माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपस्थिती लावल्याचे दिसून येत आहे. यातच बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांनी स्वबळावर लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

नव्या मुख्याधिकाऱ्यांकडून अपेक्षा  
अद्यापही नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झालेले नाही. यावरच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. नुकतेच नगरपंचायतीवर नव्याने मुख्याधिकारी म्हणून डॉ. कैलास चव्हाण आल्याने शहरातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

Web Title: mayor reservation watching