आधीच्या घोटाळ्यांनी सांगली मनपा डबघाईला - महापौर संगीता खोत

आधीच्या घोटाळ्यांनी सांगली मनपा डबघाईला - महापौर संगीता खोत

सांगली - महापौरपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच ‘सकाळ’ कार्यालयास संगीता खोत यांनी भेट दिली. त्यांनी विविध विषयांवर मनमोकळी मते मांडली. ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडून आलेल्या सौ. खोत यांना भाजपने महापौर म्हणून संधी दिली. एका प्रभागातून बाहेर पडून महापालिकेचा कारभार त्या सांभाळताहेत. भाजपने पारदर्शी, स्वच्छ कारभाराची ग्वाही दिल्याने महापालिका क्षेत्रातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली.

सौ. खोत म्हणाल्या, ‘‘शेरीनाल्याबाबत वेगळी संकल्पना राबवण्याचा विचार आहे. या प्रश्‍नाचे घोंगडे अनेक वर्षे भिजत आहे. गेल्या २०-२५ वर्षांत ४० ते ४५ कोटी रुपये वाया गेलेत. त्यामुळे नाल्यावरच शुद्धिकरण यंत्रणा बसवून पाणी स्वच्छ करण्याचा विचार आहे.

शहरातील मोकळ्या प्लॉटचा प्रश्‍न गंभीर आहे. गवत, झुडपे वाढून अस्वच्छता वाढली आहे. पाणी साचून आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होतोय. अशा प्लॉटधारकांना नोटिसा बजावणार आहे. महापालिकेच्या मोकळ्या जागाही अनेक आहेत. तेथे महापालिकेच्या मालकीचे फलक लावून त्या कशा उपयोगात आणता येतील याबाबतही विचार करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महापालिकेला देशात ११८ वा क्रमांक आला. यंदाही स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. आमराई, छत्रपती शिवाजी स्टेडियम या ठिकाणी स्वच्छता अभियान केले. यात नागरिकांनी सहभाग दिला. शहराच्या विकासात लोकसहभागही महत्त्वाचा असतो. स्वयंसेवी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतकरी बॅंकेतील ठेवी परत मिळवणार
जुन्या सत्ताधाऱ्यांच्या काळात झालेल्या घोटाळ्यांमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आलीय. वसंतदादा बॅंकेत महापालिकेच्या सुमारे ६० कोटींच्या ठेवी अडकल्यात. त्या मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या मिळाल्यास थकीत देणी देता येतील. कामे करता येतील. महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

महापौर म्हणाल्या...

  •  अमृत योजना, ड्रेनेज योजना, कुपवाड पाणी योजना पूर्णत्वास प्राधान्य देणार. 
  •  योजनांतील गैरकारभारांची माहिती घेऊ. दोषींची गय करणार नाही. 
  •  शंभर कोटीच्या निधीतून प्रत्येक नगरसेवकांना ५० लाखाची कामे सुचवण्याची सूचना.
  •  सक्षम अधिकारी, उपायुक्त देण्याची मागणी आमदारांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे. 
  •  वर्षानुवर्ष ठाण मांडणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्यांना कामाला लावले जाईल.

ठेकेदारांची ‘मोनोपॉली’ मोडणार
महापालिकेची कामे करण्यासाठी तेच ते ठेकेदार नेमले जात असल्याचे दिसते. अशा ठेकेदारांची ‘मोनोपॉली’ मोडून काढू. बागांच्या देखभालीसाठी ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव रद्द करून कामगार नेमण्याचा निर्णय घेतलाय. फक्त ठेकेदार पोसले जातील, अशी कामे होणार नाहीत. महापालिकेच्या माध्यमातूनच कामे करण्याचा प्रयत्न करू.

महापौरांचा विकासाचा अजेंडा
विस्तारित भागातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. तेच प्रामुख्याने करण्यात येतील. तीनही शहरांत भाजी मंडई उभारण्याचा मानस आहे. शहरांतील क्रीडांगणे, बागा विकसित करण्यावर भर देऊ. तीनही शहरांचा समान विकास करू. सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश होण्यासाठी प्रयत्न करू. रस्त्यांवरचे बाजार बंद व्हावेत, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी विस्तारित भागातही मंडई करण्याचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com