
सांगली महापालिकेत पुढचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच होणार, यात शंका नाही. भाजपकडे 43 सदस्यांचे बहुमत असल्याने काही अडचण येणार नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली : महापालिकेत पुढचा महापौर भारतीय जनता पक्षाचाच होणार, यात शंका नाही. भाजपकडे 43 सदस्यांचे बहुमत असल्याने काही अडचण येणार नाही, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. आज रात्री त्यांनी महापालिकेतील सर्व सदस्य आणि कोअर कमिटीची बैठक घेऊन महापौर निवडीबाबत चर्चा केली.
महापौरपदाची निवडणूक 23 फेब्रुवारीला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विजयनगर येथील एका हॉटेलमध्ये रात्री नगरसेवक, पदाधिकारी, पक्षाचे नेते यांच्याशी चर्चा केली. या वेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर गीता सुतार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर इनामदार, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, गटनेते विनायक सिंहासने, नीता केळकर, माजी महापौर संगीता खोत आदी उपस्थित होते.
या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की 100 कोटींच्या निधीतून तसेच आमदार गाडगीळ, आमदार खाडे यांच्या निधीतून प्रभागात कोणती कामे झाली याची यादी करा. गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामाचा अहवाल करा आणि तो लोकांपर्यंत पोचवा. प्रत्येक नगरसेवकाचे संपर्क कार्यालय झाले पाहिजे. तुमच्या कामाची नोंद घेतली जाईल. प्रत्येकाला संधी मिळेल. राज्यात सत्ता नसली तरी जनता आपल्या सोबत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले. पुढचा काळ आपलाच आहे.
इच्छुकांनी घेतली एकत्र भेट
महापौरपदासाठी इच्छुक असलेले सदस्य धीरज सूर्यवंशी, युवराज बावडेकर, अजिंक्य पाटील, ऍड. स्वाती शिंदे आणि निरंजन आवटी यांनी एकत्रितपणे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन आपण महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. त्याचवेळी पक्ष ज्याला संधी देईल त्याच्यासोबत राहू, असाही विश्वास दिला. आमच्यापैकी कुणालाही संधी द्यावी, असे या सर्वांनी सांगितले. यावर चंद्रकांत पाटील यांनी पहिला, दुसरा, तिसरा कुणाला संधी द्यायची हे तुम्हीच ठरवून द्या, अशी फिरकी त्यांच्यासमोर टाकली. मात्र सर्वांनी, चंद्रकांत पाटील यांनाच निर्णय घेऊन सांगा, आम्हाला मान्य होईल, असा विश्वास दिला.
महापालिका जाणार नाही
पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, की महापालिकेत भाजपचे संख्याबळ 43 आहे. त्यामुळे महापौर भाजपचाच होईल. महापालिका जाणार नाही. महापालिकेचे कामकाज नीट चालावे, यासाठी शेखर इनामदार यांना लक्ष घालण्यास सांगितले. महापौर निवडीनंतर महापालिकेच्या कारभारात लक्ष घालणार आहे.
संपादन : युवराज यादव