नगराध्यक्षपदी तिसऱ्यांदा नवा चेहरा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

रोहिणी शिंदे यांच्यामुळे साधली हॅटट्रिक; २००६ पासूनची परंपरा कायम 
कऱ्हाड - येथील नगरपालिकेत १९९६ पासून २००१ चा अपवाद वगळता निवडणुकीनंतर नव्या चेहऱ्याला नगराध्यक्षपदी संधी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदासाठी विद्यमान नगरसेविकांसह माजी नगराध्यक्षा रिंगणात असतानाही भाजपच्या रोहिणी शिंदे या नव्या चेहऱ्याला जनतेने संधी दिली. त्यामुळे सध्या तरी २००६, २०११ नंतर सौ. शिंदे यांच्या रूपाने यावेळीही नव्या चेहऱ्याच्या नगराध्यक्ष उमेदवाराने हॅटट्रिक साधल्याचे पाहायला मिळते. 

ज्येष्ठ नेते (कै.) पी. डी. पाटील यांनी १९९६ ला पालिका राजकारणातून निवृत्ती घेतली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पालिकेत सत्तांतर होवून नगराध्यक्षपदी नव्याने निवडून आलेल्या अर्चना पाटील यांना संधी मिळाली. सौ. पाटील यांना कऱ्हाडच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा होण्याचा मान मिळाला. १९९६ ते २००१ या कालावधीत बाळूताई सूर्यवंशी, अशोक भोसले, (कै.) जयवंतराव जाधव, जयवंत पाटील यांना संधी मिळाली. त्यानंतर २००१ च्या पालिका निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्ष निवड झाली. त्यात पालिकेच्या कामकाजाचा अनुभव असणाऱ्या शारदा जाधव यांना मतदारांनी संधी दिली. त्यानंतर २००६ च्या निवडणुकीनंतर तिघा अपक्षांच्या सहकार्याने लोकशाही आघाडी सत्तेवर आली. त्यावेळी सुषमा लोखंडे यांना नगराध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली. २००६ ते २०११ या कालावधीत सौ. लोखंडे यांच्या दीड वर्षाच्या कारकिर्दीनंतर वर्षभरात रामचंद्र कोळी व अल्ताफ शिकलगार यांना नगराध्यक्ष होता आले. २०११ मध्ये निवडणुकीनंतर लोकशाही आघाडीने हद्दवाढ भागातील प्रभागातून निवडून आलेल्या उमा हिंगमिरे यांना नगराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या अडीच वर्षाच्या कालावधीनंतर ॲड. विद्याराणी साळुंखे, संगीता देसाई यांना संधी मिळाली.

नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून झाली. त्यात माजी नगराध्यक्षा बाळूताई सूर्यवंशी यांच्यासह नगरसेविका लीना थोरवडे, शीतल वायदंडे या पालिकेच्या कामाचा पूर्वानुभव असणाऱ्या उमेदवार होत्या. त्यातही सौ. थोरवडे यांना सत्तारूढ लोकशाही आघाडीने उमेदवारी दिली होती. सौ. वायदंडे व सौ. सूर्यवंशी या अपक्ष लढल्या. त्यामुळे पालिकेच्या कामकाजाचा पूर्वानुभव असणाऱ्या उमेदवारांपुढे नवखा उमेदवार कितपत टिकाव धरणार? याकडे लक्ष होते. मात्र, याहीवेळी जनतेने भाजपच्या उमेदवार सौ. शिंदे यांना निवडून देत नगराध्यक्षपदी नवा चेहरा दिला. त्यामुळे सौ. शिंदे यांच्या रूपाने नव्या चेहऱ्याची हॅटट्रिक झाली आहे. 

नगराध्यक्षपदाची लॉटरी...
कऱ्हाड पालिकेत आजपर्यंत कधीही कोणाला ठरवून नगराध्यक्षपद मिळालेले नाही. प्रत्येकवेळी अनपेक्षितपणे या पदासाठी नवीन नाव पुढे आले आहे. २००६ मध्ये अनुभवी नगरसेविका असतानाही तत्कालीन राजकीय परिस्थितीत सुषमा लोखंडे यांना, तर २०११ निवडणुकीनंतर उमा हिंगमिरे यांना संधी मिळाली आहे. त्यामुळे आजपर्यंत कुणीही कितीही फिल्डिंग लावली तरी नगराध्यक्षपदाची लॉटरी नव्या चेहऱ्याला मिळाल्याचा इतिहास आहे. 

Web Title: mayor third new face in karad