महापौरासाठी "या' महापालिकेत सुरु "मॅजिक फिगर'चा खेळ 

महापौरासाठी "या' महापालिकेत सुरु "मॅजिक फिगर'चा खेळ 

सोलापूर ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीत आकड्यांचा खेळ सुरु आहे. भाजप म्हणतो आमच्याकडे 170 तर महाविकास आघाडी म्हणते आमच्याकडे "162'. नेमके कुणाकडे किती संख्याबळ हे उद्या (बुधवारी) सायंकाळी स्पष्ट होईलच. याच धर्तीवर सोलापूर महापालिकेतही महापौर निवडणुकीत "मॅजिक फिगर' गाठण्याचा खेळ सुरु झाला आहे. त्यात कोण किती यशस्वी होते हे चार डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे. 

भाजप सर्वात मोठा पक्ष 
महापौरपदी निवडून येण्यासाठी 52 मते आवश्यक आहेत. महापालिकेत 49 नगरसेवकांसह भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. त्या खालोखाल शिवसेना 21, कॉंग्रेस 14, राष्ट्रवादी कॉंग्रेस चार, वंचित बहुजन आघाडी तीन, माकप व बसप प्रत्येकी एक आणि एमआयएमचे आठ सदस्य आहेत. हे सर्व एकत्रित आले तर त्यांची संख्या 53 होते. एमआयएमचे तौफीक शेख यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने संख्या एकने कमी झाली असून, ती 52 होते. त्यामुळे सर्व विरोधक एकत्रित आले तर महापौरपदी भाजपतेर व्यक्ती विराजमान होऊ शकतो. त्या दृष्टीने सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. 

पटेल, काटकर, शेख, अंकाराम चर्चेत 
महापौरपद कॉंग्रेसला दिले तर इतर पक्षाला कोणकोणती पदे मिळतील याचा अंदाज बांधणेही सुरु झाले आहे. मात्र हे सर्व तेंव्हाच शक्‍य आहे, जेंव्हा पक्षीय मतभेद विसरून आणि भाजपला दूर सारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन सर्व विरोधक एकत्रित आले तरच. महापौरपदासाठी कॉंग्रेसकडून फिरदोस पटेल, अनुराधा काटकर, एमआयएमकडून शहाजीदाबानो शेख, शिवसेनेकडून कुमुद अंकाराम यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. 

भाजपला घ्यावी लागणार दक्षता 
विरोधकांनी सुरु केलेल्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला फार सावध पद्धतीने निर्णय घ्यावे लागणार आहेत. उमेदवारीवरून कोणताही पेचप्रसंग पक्षांतर्गत निर्माण होणार नाही यासाठी आतापासूनच दक्ष राहणे आवश्‍यक आहे. सध्या आघाडीवर असलेल्या श्रीकांचना यन्नम यांना उमेदवारी मिळाली तर भाजपमधील एक गट निश्‍चित फुटेल असा विश्‍वास महाविकास आघाडीतील नगरसेवकांतून व्यक्त होत आहे, त्याचवेळी यन्नम यांना डावलून दुसऱ्याला संधी दिली तर, भाजपमधील दुसरा गट बंड करेल याचाही अंदाज महाविकास आघाडीतील नेत्यांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर नेमके काय होणार हे चार डिसेंबर रोजीच स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी एकत्रित आली नाही तर, "मॅजिक फिगर'ची गरज न लागताही भाजपचा उमेदवार महापौर होणार हे जवळपास निश्‍चित आहे. 

महाविकास आघाडीचे ठरवलेले संभाव्य "मंत्रीमंडळ' 
महापौर ः कॉंग्रेस 
उपमहापौर ः एमआयएम 
सभागृहनेता ः शिवसेना 
स्थायी समिती ः शिवसेना 
महिला व बालकल्याण ः राष्ट्रवादी कॉंग्रेस 
परिवहन समिती ः वंचित बहुजन आघाडी 
शिक्षण मंडळ ः बहुजन समाज पक्ष किंवा माकप  महाराष्ट्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com