आयटीआय ते ऑस्ट्रेलियापर्यंतचा प्रवास... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

कऱ्हाड - परदेशस्थित झाल्यानंतर शक्‍यतो मायदेशाशी जास्त संपर्क बहुतांशी जणांना ठेवणे तितकेसे जमत नाही. तेथील कामाची अवस्था, वेळ, लाइफस्टाइल पाहाता ते तितकेच नैसर्गिकही वाटत नाही. वारुंजी येथील मयूर पाटील याने परेदशात राहूनही देशाशी विशेष करून महाराष्ट्राशी वेगळे नाते ठेवून नाळ जोपासली आहे. मयूरला मिळालेली संधी खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी आहे. तीच संधी प्रत्येकाला मिळावी, यासाठी तो आयटीआयच्या होतकरू तरुणांना नोकरीच्या संधी परदेशात कशा उपलब्ध आहेत, याचे मार्गदर्शनही करतो आहे. 

कऱ्हाड - परदेशस्थित झाल्यानंतर शक्‍यतो मायदेशाशी जास्त संपर्क बहुतांशी जणांना ठेवणे तितकेसे जमत नाही. तेथील कामाची अवस्था, वेळ, लाइफस्टाइल पाहाता ते तितकेच नैसर्गिकही वाटत नाही. वारुंजी येथील मयूर पाटील याने परेदशात राहूनही देशाशी विशेष करून महाराष्ट्राशी वेगळे नाते ठेवून नाळ जोपासली आहे. मयूरला मिळालेली संधी खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनाला कलाटणी देणारी आहे. तीच संधी प्रत्येकाला मिळावी, यासाठी तो आयटीआयच्या होतकरू तरुणांना नोकरीच्या संधी परदेशात कशा उपलब्ध आहेत, याचे मार्गदर्शनही करतो आहे. 

मयूर हा ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण, नोकरीच्या उपलब्ध संधींची माहिती देण्यासाठी व त्या संधी मिळवायची असल्यास काय करावे लागेल यासंदर्भात मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी मयूरने "आयफ्लाय' अशी कन्सल्टन्सी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून त्याने काम सुरू केले आहे. त्यातून केवळ उच्चशिक्षण घेऊनच परदेशी जाता येते या संकल्पनेला फाटा दिला आहे. मयूरने होतकरू तरुणांना परदेशात जाण्याचे मार्गही सांगण्यास सुरवात केली आहे. आयटीआयसारखे शिक्षण घेऊन मयूर ऑस्ट्रेलियाचा कायम निवासी झाला आहे. कऱ्हाड येथील आयटीआय कॉलेजमध्ये त्याचे शिक्षण झाले. मयूरने सांगितल्यानुसार परदेशात कुशल कामगारांची गरज आहे, ते ओळखून होतकरू तरुणांसाठी ऑस्ट्रेलियासारख्या देशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, याची माहिती तो देत आहे. 

कऱ्हाड येथील संस्थेतून मयूरने औद्योगिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याला दुबई, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्याची संधी मिळाली. सामान्य आर्थिक स्थितीशी दोन हात करत त्याला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. करिअर मार्गदर्शन करणारे कोणीही नाही, इंग्रजी भाषेचा गंधही नाही, तरीही मयूरने ऑस्ट्रेलियाला जाण्याचे स्वप्न पूर्ण केले. ध्येय ठेवून मयूरने ऑस्ट्रेलियामध्ये आज व्यक्तिमत्त्व उभे केले आहे. मार्गात अडचणी होत्या, तरीही त्यावर त्याने मात केली. त्यात त्याला त्याचे शिक्षक पांडुरंग पवार यांची मोलाची मदत झाली. त्यातील मुख्य अडचण म्हणजे ऑस्ट्रेलियाला जायचे म्हणजे नेमके काय करावे लागेल? हेच माहीत नसतानाही त्याने ती किमया साध्य केली. परदेशात जॉबला पाठवण्याचे आश्वासन देणाऱ्या काही संस्था आणि एजंटांकडून आर्थिक नुकसान सोसावे लागलेच. मात्र, त्या सगळ्यांवर मात करून मयूरने त्याचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, अशाच स्थितीशी सामान्य कुटुंबातील तरुणांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी मयूर सध्या धडपडतो आहे. ग्रामीण भागातील तरुणांना मार्गदर्शन व्हावे, परदेशातील नोकऱ्यांची कवाडे खुली व्हावीत, अशी इच्छा ठेवणाऱ्या मयूरने "आयफ्लाय' नावाची संस्था काढली. त्याद्वारे तो होतकरू तरुणांना मार्गदर्शन करतो आहे. आतापर्यंत त्यांनी कऱ्हाड, पाटण, इचलकरंजी, शिराळा येथील आयटीआय मध्ये 500 हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, तसेच आताच्या घडीला जे जॉब अथवा अप्रेंटिस करत आहेत, अशा लोकांना देखील ऑस्ट्रेलियामध्ये करिअर संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

""राज्यात 400 पेक्षा अधिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण आणि 300 हून अधिक खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत; जिथे 134 प्रकारचे व्यवसाय म्हणजे ट्रेडचे प्रशिक्षण मिळते. त्यातून दर वर्षी अनेक कुशल कामगार तयार होतात. त्या सगळ्यांसाठी परदेशात कवाडे खुली आहेत. ती त्यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहे.'' 

Web Title: Mayur patil Travel from ITI to Australia