सांगलीत महापालिकेसमोरच सापडला वैद्यकीय कचरा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी करुन वैद्यकीय कचरा रस्त्यावरच टाकणाऱ्यांवर लाखापर्यंतचा दंड केला होता. मात्र, आज महापालिकेच्या प्रसुतीगृहाच्या मागील भागात हरभट रोडवर वैद्यकीय कचरा सापडला.

सांगली : महापालिकेच्या आरोग्य विभागाने दोन महिन्यांपूर्वी महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची तपासणी करुन वैद्यकीय कचरा रस्त्यावरच टाकणाऱ्यांवर लाखापर्यंतचा दंड केला होता. मात्र, आज महापालिकेच्या प्रसुतीगृहाच्या मागील भागात हरभट रोडवर वैद्यकीय कचरा सापडला.

या कचऱ्यामध्ये प्रसूतीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्‍शन, औषधांच्या बाटल्या आहेत. मात्र, त्या महापालिकेच्या नसल्याचा दावा करण्यात येत आहे. या कचऱ्याचा पंचनामा करुन तो ताब्यात घेण्यात आला आहे. त्याची चौकशी करण्यात
येणार आहे. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहाच्या मागे असलेल्या हरभट रोडवर आज सकाळी शहर सुधार समितीचे अध्यक्ष ऍड. अमित शिंदे यांना रस्त्यावर इंजेक्‍शनच्या सुया, त्यातून वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या
कुपी, वापरलेले कापसाचे बोळे असा वैद्यकीय कचरा आढळून आला.

महापालिका मुख्यालयापासून काही मीटर अंतरावरच हा कचरा पडला होता. ऍड. शिंदे यांनी औषधांच्या कुपीवरील माहिती वाचून डॉक्‍टरांशी संपर्क साधला असता ही औषधे प्रसुतीवेळी वापरण्यात येतात. हिमोग्लोबीन आणि कॅल्शियम वाढीची औषधे आहेत. तसेच वेदनाशामक औषधेही आहेत. यामुळे सदरचा वैद्यकीय कचरा हा महापालिकेच्या प्रसुतीगृहातीलच असल्याचा संशय आहे. ऍड. शिंदे यांनी याबाबत महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. आयुक्तांनी ताबडतोब आरोग्य अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले.

अधिकाऱ्यांनी सदरची औषधे महापालिकेची नाहीत, आम्ही
वेगळी औषधे वापरतो असा दावा केला. मात्र, ऍड. शिंदे यांनी सदरच्या औषधांचा पंचनामा करुन ती ताब्यात घ्यावीत. त्यांची तांत्रिक माहिती घेऊन त्याची चौकशी करुन तपास करावा, अशी मागणी केली. त्यानुसार या वैद्यकीय कचऱ्याचा पंचनामा करुन ताब्यात घेण्यात आली आहेत.

महापालिकेच्या प्रसुतीगृहाच्या मागेच सापडलेल्या सुया, औषधे प्रसुतीवेळी वापरण्यात येतात, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा वैद्यकीय कचरा महापालिकेच्या प्रसुतीगृहाचा असल्याचा आमचा दावा आहे. एकीकडे वैद्यकीय कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही म्हणून खासगी रुग्णालयांना लाखांचा दंड केला जातो. त्यामुळे हा कचरा महापालिकेच्या प्रसुतीगृहाच्या असल्यास अधिकाऱ्यांना लाख रुपयांचा दंड करावा, अशी आमची मागणी आहे.

- ऍड. अमित शिंदे, अध्यक्ष, शहर सुधार समिती

Web Title: Medical Garbage found in front of Sangli Municipality