वैद्यकीय अधिकारी पाहिजे हो... 

Medical Officers Vacancy in pathardi
Medical Officers Vacancy in pathardi

पाथर्डी ः येथील पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकपद साडेतीन वर्षांपासून रिक्त आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, तीन वैद्यकीय अधिकारी, तसेच कर्मचारी अशी विविध पदे रिक्त आहेत. अँटी रेबीज लस व इतरही औषधांचा तुटवडा कायम असतो. अशा स्थितीत उपजिल्हा रुग्णालयाचा कार्यभार सुरू आहे. 

पदे मंजूर; पण कार्यरत नाहीत 
यामुळे महिला व गरीब रुग्णांची हेळसांड होते. पाथर्डी शहरात पन्नास खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. गरिबांचा दवाखाना म्हणून एकेकाळी नावलौकिक असणारे हे रुग्णालय सध्या रिक्त पदांमुळे रुग्णांच्या टीकेचे धनी होत आहे. येथे वैद्यकीय अधीक्षकांसह सात वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन वैद्यकीय अधिकारी उपस्थित असतात. 

प्रभारी पदभार 
डॉ. नवनाथ आव्हाड हे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहतात. दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बांगर हे बालरोगतज्ज्ञ आहेत. येथे नेमणुकीला असलेले डॉ. अशोक कराळे व डॉ. स्वाती फडतरे हे प्रतिनियुक्तीवर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात काम करतात. त्यांच्या बदल्यात डॉ. श्रीतेज जेजूरकर आठवड्यातील दोन दिवस पाथर्डीत काम पाहतात. 

शस्त्रक्रिया थांबल्या 
एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला आहे. दिवसाला ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या शंभरापेक्षा जास्त असते. स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नसल्याने कुटुंबनियोजनाच्या शस्त्रक्रिया दोन महिन्यांपासून होत नाहीत. रिक्त जागा असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यावरही अतिरिक्त ताण येतो. वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश राऊत यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे रुग्णांची सोय व्हावी यासाठी रिक्त जागा भराव्यात अशी मागणी रुग्णांमधून होत आहे. औषधांचा पुरवठाही कमी असतो. 

अतिरिक्त कामाचा ताण 
स्त्रीरोगतज्ज्ञ व भूलतज्ज्ञांची नेमणूक तातडीने केली जावी. रिक्त वैद्यकीय अधिकारी व प्रतिनियुक्तीवर असलेले दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा तातडीने भराव्यात. अनेक रुग्ण छोट्याशा कारणासाठी नगरला पाठवावे लागतात. दोनच वैद्यकीय अधिकारी असल्याने अतिरिक्त कामाचा ताणही होतो. रोजच्या कामाला न्याय देता येत नाही. 
- डॉ. नवनाथ आव्हाड, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक 

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भराव्यात 
महिला व गरीब रुग्णांची हेळसांड होते. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाहीत. औषधे शिल्लक नाहीत. स्त्रीरोगतज्ज्ञ नाहीत. यामुळे गरीब रुग्णांची अडचण होते. हे रुग्णालय केवळ देखाव्यापुरते उरले आहे. नगरमधील जिल्हा शल्यचिकित्सक यांनी लक्ष घालून वैद्यकीय अधिकारीपदे भरावीत. रुग्णांना सेवा मिळावी. 
- भारती असलकर, तनिष्का सदस्य, पाथर्डी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com