वैद्यकीय कचरा भस्मीकरण केंद्र दोन वर्षे बंद

वैद्यकीय कचरा भस्मीकरण केंद्र दोन वर्षे बंद

सांगली - महापालिकेचे बेडग रस्त्यावरील जैववैद्यकीय कचरा भस्मीकरण केंद्र पावणेदोन वर्षांपासून कुलूपबंद स्थितीत आहे. वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला खासगी संस्थेची मदत घ्यावी लागत आहे. आयएमएने लाखो रुपये खर्चून केंद्राचे नूतनीकरण केले, मात्र ते सुरू करण्यासाठी संबंधित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात महापालिका विलंब करत आहे. 

हे अद्ययावत वैद्यकीय कचरा भस्मीकरण केंद्र आठ-दहा वर्षांपासून पूर्ण क्षमतेने कार्यरत नाही. त्यामुळे मिरजेतील चारशेवर दवाखान्यांतून दररोज येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट लावण्यात सध्या अडचणी येत आहेत. तसेच अनेक दवाखान्यांशेजारची कोंडाळी वैद्यकीय कचऱ्याने भरून वाहत आहेत. रक्ताळलेली कापडे, बॅंडेज, सीरिज, औषधांची खोकी कोंडाळ्यात आहेत. गेल्या महिन्यात महापालिकेने वैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या दवाखान्यांना लाख रुपयांपर्यंतचा दंड केला, मात्र भस्मीकरण केंद्रासाठी हालचाली गतिमान केल्या नाहीत.

कत्तलखान्याजवळचे भस्मीकरण केंद्र सातत्याने वादात राहिले आहे. वर्षातील अनेक महिने बंदच असल्याने कचरा खासगी संस्थेकडे द्यावा लागतो. दवाखान्यांकडून शुल्क घेऊन ही संस्था कचऱ्याची विल्हेवाट लावते. डॉक्‍टरांची संघटना असलेल्या आयएमएने काही वर्षांपूर्वी भस्मीकरण केंद्र स्वतःच चालवण्यास घेतले. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आतील विविध यंत्रणांची दुरुस्ती केली. १०५ फूट उंचीची चिमणी बदलली. स्क्रबर, पंखे बदलले. विद्युतीकरण नव्याने केले. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे; त्यासाठीची प्रक्रिया महापालिकेकडून म्हणाव्या तितक्‍या गतीने होत नसल्याचा अनुभव आहे. 

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
उघड्यावर पडणारा वैद्यकीय कचरा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आहे. शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेले अवयव विल्हेवाट लावण्याऐवजी अनेकदा मिरज शहरालगत पुरल्याचे उघडकीस आले आहे. अनेकदा कोंडाळ्यातही सापडले आहेत. मोकाट जनावरांच्या पोटात वैद्यकीय कचरा सापडला आहे. त्याची विल्हेवाट लावण्यासाठीची कोट्यवधींची यंत्रणा धूळ खात पडली आहे. कचरा उघड्यावर टाकल्याचे आढळल्यास डॉक्‍टरांना महापालिका लाखो रुपयांचा दंड ठोठावत आहे. यामध्ये डॉक्‍टरांची कोंडी झाली आहे. 

सहा तालुक्‍यांतील दवाखान्यांचा प्रश्‍न
मिरज शहरासह जिल्ह्याच्या पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडीचा, खानापूर तालुक्‍यांतील दवाखान्यांतील कचरा महापालिकेच्या भस्मीकरण केंद्रात येतो. सध्या केंद्र बंद असल्याने दवाखान्यांची कोंडी झाली आहे. दररोज किमान तीन ते चार टन कचरा टाकायचा कोठे? असा प्रश्‍न आहे. खासगी संस्थेवर सांगलीसह पश्‍चिम भागातील तालुक्‍यांचा बोजा आहे; त्यात उर्वरित जिल्ह्यातील कचऱ्याची भर पडली आहे. 

महापालिकेने वैद्यकीय कचरा भस्मीकरण केंद्रातील सर्व दुरुस्त्या केल्या आहेत. त्याला आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज आहे. त्यासाठीचा प्रस्ताव मंडळाकडे पाठवला आहे. ते मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मिळताच केंद्र सुरू होईल. महापालिका किंवा आयएमएमार्फत चालवण्याबाबतचा निर्णय महापालिका स्तरावर होईल.
- डॉ. सुनील आंबोळे,
आरोग्याधिकारी.

आयएमएने पस्तीस लाख रुपये खर्चून भस्मीकरण केंद्रातील कामे पूर्ण केली आहेत. आता महापालिकेकडून कागदोपत्री पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. सध्या खासगी केंद्राकडे वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी द्यावा लागत आहे.
- डॉ. संजय कुरेशी,
वैद्यकीय कचरा विल्हेवाट विभाग, आयएम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com