रुग्णांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार!

प्रवीण जाधव
बुधवार, 26 एप्रिल 2017

औषधांअभावी स्‍थिती; डॉक्‍टरांची चिठ्ठीमुक्‍तीमुळे अडचण

सातारा - चिठ्ठीमुक्त दवाखान्याची बिरुदावली मिरविणाऱ्या जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या अनेक प्रकारची औषधे एक तर नाहीत किंवा उपलब्धता कमी असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही चिठ्ठीमुक्तीमुळे बाहेरून घ्यायला औषधे लिहून देता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत असल्यासारखी परिस्थिती आहे.

औषधांअभावी स्‍थिती; डॉक्‍टरांची चिठ्ठीमुक्‍तीमुळे अडचण

सातारा - चिठ्ठीमुक्त दवाखान्याची बिरुदावली मिरविणाऱ्या जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या अनेक प्रकारची औषधे एक तर नाहीत किंवा उपलब्धता कमी असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही चिठ्ठीमुक्तीमुळे बाहेरून घ्यायला औषधे लिहून देता येत नाहीत. त्यामुळे रुग्णांना तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करावा लागत असल्यासारखी परिस्थिती आहे.

सामान्य रुग्णांना जिल्हा रुग्णालयातच सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आघाडी शासनाच्या काळात चांगले प्रयत्न झाले. त्यातूनच चिठ्ठीमुक्त दवाखाना ही संकल्पना राबविली गेली. रुग्णांना बाहेरूनची औषधे लिहून देण्यास तेव्हापासून वैद्यकीय अधिकाऱ्यांना बंदी आहे. कोणी डॉक्‍टर तसे करत असल्यास त्याची तक्रार करण्यासाठी १०४ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. त्याचे फलकही रुग्णालयात जागोजागी लावण्यात आले आहेत. मात्र, हाच नियम आता रुग्णांसाठी धोकादायक बनत चालला आहे.

सध्या रुग्णालयामध्ये विविध विभागांच्या औषधांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. अगदी लहान मुलांच्या विभागाचीही दयनीय अवस्था आहे. केवळ दोन प्रकराची ॲन्टीबायोटिक औषधे उपलब्ध आहेत. विषबाधा व डोक्‍याला मार लागलेल्यांवर उपचारासाठी आवश्‍यक असलेली औषधे नेहमी उपलब्ध असतात असे नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांना गरज भासल्यास ती मागवावी लागतात. उन्हाळ्याच्या दिवसात मुलांना वारंवार त्रास होणाऱ्या उलटीच्या आजाराचीही औषधे नाहीत. लहान मुलांनाही अनेक वेळा मोठ्यांच्या गोळ्या देऊन त्याचे तुकडे करून खायला सांगावे लागते.

मेडिसीन, आर्थोपेडिक विभागाचीही काही औषधे वेळेवर उपलब्ध नसतात. त्यामुळे रुग्णाला अनेकदा औषधाचे रांगेतून पुन्हा डॉक्‍टरांकडून औषधे बदलून आणण्यासाठी पाठविले जाते. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा रांगेत उभे राहण्याची वेळ येते. त्वचारोग विभागातही पुरेशा प्रमाणात औषधे नाहीत. प्रामुख्याने बुरशीजन्य आजारावरची औषधे उपलब्ध नसतात.

उन्हाळ्यामध्ये अशा औषधांची प्रामुख्याने गरज भासते. अनेकदा पत्रव्यवहार करूनही ही औषधे उपलब्ध होत नाहीत. युनानी विभागात कधीतरीच पुरेशी औषधे असतात. होमिओपॅथीच्या काही औषधांचाही तुटवडा असतो. औषधांची कतरता असताना चिठ्ठीमुक्तीच्या नाऱ्यामुळे रुग्णांना बाहेरची औषधेही लिहून दिली जात नाहीत. अनेक वेळा त्याबाबत तक्रारी झाल्याने वैद्यकीय अधिकारीही बाहेरून औषधे देण्यास उत्सुक नसतात. गरज म्हणून अशा प्रकारची चिठ्ठी देऊन कारवाईला का सामोरे जायचे, असा त्यांचा सवाल आहे. मात्र, या परिस्थितीमुळे रुग्णांना बऱ्याचदा औषधाविनाच परतावे लागते. जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालयातच ही अवस्था असल्यावर नागरिकांनी काय करायचे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.
 

‘काढा असतो तर, गोळ्या नसतात’!
आयुष विभागाचीही अशीच अवस्था आहे. गेल्या काही वर्षांत या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे या विभागातील रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे औषधांची कतरता भासत आहे. आयुर्वेदिक विभागात ‘काढा आहे तर, गोळ्या नाहीत’, ‘गोळ्या आहेत तर, काढा नाही’ आणि दोन्ही असले तर, क्रिम नसते, अशी परिस्थिती आहे.

Web Title: medicine shortage in district hospital