मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव देणार - सुधीर गाडगीळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

सांगली - वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात महिला आणि मुलांसाठी हॉस्पिटल उभे करण्याबरोबरच तेथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला देणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली मतदारसंघासाठी ६२ कोटी ३३ लाखांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली - वसंतदादा सर्वोपचार रुग्णालयाच्या आवारात महिला आणि मुलांसाठी हॉस्पिटल उभे करण्याबरोबरच तेथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला देणार असल्याची माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी आज दिली. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात सांगली मतदारसंघासाठी ६२ कोटी ३३ लाखांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सांगली विधानसभा मतदारसंघासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीची आणि नवीन प्रस्तावांची माहिती आमदार गाडगीळ यांनी पत्रकार बैठकीत दिली. ते म्हणाले, ‘‘वसंतदादा शासकीय रुग्णालयातील इमारतींची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्‍या व स्वच्छतागृहांची दुरुस्ती, नर्सेस वसतिगृह, मुलांचे वसतिगृह, नर्सेस ट्रेनिंग सेंटर, डॉक्‍टर निवासस्थान दुरुस्ती आदी विविध कामांसाठी १० कोटी ६२ लाख ७६ हजार रुपये मंजूर केले आहेत. तर यंदाच्या अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालयातील नवीन रक्तपेढी, नवीन वॉर्ड बांधकाम आदींसाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 

याशिवाय शासकीय रुग्णालयाच्या आवारात मेडिकल कॉलेज उभारण्याबाबत प्रस्ताव देणार आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी याबाबत बोलणे झाले आहे. शासकीय रुग्णालयात डॉक्‍टरांची मोठी कमतरता भासत असल्याने कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव देणार आहे.’’

पेठ-मिरज रस्त्याचा डीपीआर अंतिम टप्प्यात
आमदार गाडगीळ म्हणाले, ‘‘पेठ-सांगली-मिरज हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात मंजूर केला असून त्याचे डीपीआर काम अंतिम टप्प्यात आहे. या रस्त्यावर आष्टा स्टॅंड, सांगलीतील विश्रामबाग चौक आणि नवीन प्रशासकीय इमारतीसमोरचा चौक या ठिकाणी फ्लाय ओव्हर करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होणार नाही. तसेच हरिपूर कोथळी पुलाची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वारणाली येथील रेल्वे पुलाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. हा पूल लवकर पूर्ण करून वाहतुकीस खुला करण्याचा प्रयत्न आहे.’’

आरटीओ, कारागृहासाठी नवीन जागा
आरटीओ आणि जिल्हा कारागृहासाठी जागा कमी पडत असल्याने या दोन्ही कार्यालयांसाठी कवलापूर विमानतळाची जागा देण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. ही जागा महसूल विभागाची आहे. मात्र विमानतळासाठी ती एमआयडीसीच्या ताब्यात दिली होती. ती पुन्हा महसूल विभागाकडे घेऊन शासकीय कार्यालयांसाठी देण्याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली.

नवीन पूल दोन वर्षांत पूर्ण करणार
आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा पूल दोन वर्षांत पूर्ण करून तो वाहतुकीस चालू करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आमदार गाडगीळ यांनी दिली. तसेच नवीन न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतींसाठी नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत, तर रस्त्यांसाठी साडेनऊ कोटी रुपये तरतूद केली आहे, असे ते म्हणाले.

Web Title: medicla college proposal