कोल्हापूर - मुंबई विमानसेवा दृष्टिपथात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत उद्या (ता. 17) मुंबई विमानतळावर संबधितांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. 

कोल्हापूर - गेली अनेक वर्षे रखडलेली कोल्हापूर - मुंबई विमानसेवा सुरू करण्याबाबत ट्रु जेट एअरवेजला मुंबई विमानतळावर सद्या उपलब्ध असलेल्या 16 स्लॉटमध्ये आणखी एक स्लॉट वाढवून देण्याचा निर्णय आज मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत उद्या (ता. 17) मुंबई विमानतळावर संबधितांची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. 

पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीला खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार अमल महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह विमान कंपनी, विमानतळ प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी, कोल्हापूर विमानतळाचे कमलेश कटारिया आदि उपस्थित होते.

कोल्हापूर - मुंबई विमानसेवेसाठी आठवड्यातील किमान पाच दिवस मुंबई विमानतळावर स्लॉट मिळावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत माजी खासदार महाडिक यांनी केली. ही वेळ सकाळी साडेसात वाजता असावी, अशीही मागणी त्यांनी केली. यावर मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांना "ट्रु जेट' एअरलाईनला  देण्यात आलेल्या एकूण 16 स्लॉट मध्ये एक स्लॉट वाढवून 17 करावे, तसेच या कंपनीने कोल्हापूरला दिलेल्या 3 स्लॉट मध्ये वाढ करून 5 स्लॉट करावेत व सदरचे स्लॉट हे कामाच्या दिवसात द्यावेत अशी विनंती बैठकीत केली आहे.

तथापि मुंबई विमानतळावर स्लॉटची उपलब्धता आहे का नाही, ती किती वाजता आहे याची माहिती घेण्यासाठी उद्या (ता. 17) मुंबई विमानतळावर कंपनीचे अधिकारी, विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्याचे यावेळी ठरले. 

पालकमंत्री भडकले 
ट्रु जेटला आताच जळगांवसाठी 7, नांदेडसाठी सहा तर कोल्हापुरसाठी तीन स्लॉट दिल्याचे जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी जळगांव व नांदेडचा एक स्लॉट कमी करून तो कोल्हापुरसाठी द्यावा अशी सुचना धनंजय महाडिक यांनी केली. पण ते शक्‍य नसल्याचे जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांनी सांगताच पालकमंत्री पाटील हेही चांगलेच भडकले. तुमचीही आमच्याकडे कामे असतात या भाषेत त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दम दिला. कोणत्याही परिस्थितीत कोल्हापुरसाठी स्लॉट द्यावाच लागेल असे श्री. पाटील यांनी सांगितले. त्यानंतर अधिकारी नरमले. 

प्रतिष्ठेचा मार्ग होईल 
मुंबईतील शिवाजी महाराज टर्मिनल्स ते कोल्हापुरातील शाहू महाराज टर्मिनल असा प्रतिष्ठेचा मार्ग यानिमित्ताने सुरू होईल, त्यामुळे ही सेवा तातडीने सुरू करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली. यावर सकाळी साडेसात वाजता सेवा देण्याचे विमान कंपनीने मान्य केले, पण त्यावेळी विमान येत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यावर कोल्हापुरला रात्री विमान पार्किंगसाठी आणावे आणि सकाळी कोल्हापूर-मुंबई विमान अशी सेवा सुरू करावी, अशी सुचना श्री. महाडिक यांनी मांडली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meeting in Mumbai on Kolhapur - Mumbai airport service