नगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

नगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात जबाबदार सक्षम अधिकारी नसताना सत्ताधाऱ्यांनी अवघ्या 12 मिनिटात सभा गुंडाळली. तसेच सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाल्याचे स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी घोषित केले. 

नगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात जबाबदार सक्षम अधिकारी नसताना सत्ताधाऱ्यांनी अवघ्या 12 मिनिटात सभा गुंडाळली. तसेच सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाल्याचे स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी घोषित केले. 

ही सभा नियमबाह्य गुंडाळण्यात आल्याची तक्रार विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी मंत्रालयातील नगरसचिव मनिषा म्हैसकर, आयुक्‍त घनश्‍याम मंगळे व महापालिका पिठासीन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे. तसेच महापालिकेतील "पतीराज' संपविण्यासंदर्भातही पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले. 

या सभेत अमृत योजना अभियाना अंतर्गत भुयारी गटार योजना ई-निविदा, 16 फेब्रुवारी 2017पासूनच्या नऊ स्थायी समितीच्या सभांतील कार्यवृत्त तहकूब, महानगरपालिकेचे इलेक्‍ट्रीक विभागात तात्पूत्या स्वरूपात वायरमन नियुक्‍ती, घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी साहित्य खरेदी आदी विषयावर चर्चा होणार होती. 

सकाळी 10.35 वाजता सभा सुरू झाली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती सुवर्णा जाधव, विरोधीपक्षनेते बाळासाहेब बोराटे, बाबासाहेब वाकळे, डॉ. सागर बोरूडे, दत्ता कावरे, मुदस्सर शेख, संजय शेंडगे हे नगरसेवक तर प्रभारी कर उपायुक्‍त दिगंबर कोंडा, नगर सचिव एस.बी. तडवी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे, झेंडीगेट विभागाचे अशोक साबळे आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्‍त मात्र अनुपस्थित होते. 

सभा सुरू होताच बोराटे म्हणाले, नगरसचिव व प्रभारी कर उपायुक्‍त हे सभा बोलावू शकतात मात्र सभा घेऊ शकत नाहीत. आयुक्‍त आल्याशिवाय सभा सुरू करू नये. विषय गंभीर आहेत. चुकीचे निर्णय झाले तर आम्ही तुरूंगात जाणार नाही.'' याकडे दुर्लक्ष करत सभापती जाधव यांनी विषय वाचण्यास सांगितले. यावर बोराटे म्हणाले ""गेली एक वर्षापासून इतिवृत्त कायम केलेले नाही. प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा झाली पाहिजे.'' 

मुदस्सर शेख म्हणाले, "प्रभारी उपायुक्‍तांना सभा घेण्याचा अधिकार नाही. सक्षम अधिकारी नसल्याने ही सभा बोगस आहे. एक वर्षाचे इतिवृत्त शिल्लक का राहिले?'' असा प्रश्‍न उपस्थित केला. नगर सचिव तडवी यांनी ""आम्ही सभापतींकडे फाईल पाठवतो. सभापती ज्या विषयावर खुण करतात तेच विषय झाले. उर्वरित राहिले आहेत'' असे सांगितले. 

डॉ. सागर बोरूडे यांनी "शहराच्या विकासासाठी भूयारी गटार विषय महत्त्वाचा आहे. सर्व विषय मंजूर करावेत'' अशी सूचना मांडली. यावर सभापती जाधव यांनी "सर्व विषय सर्वानुमते मंजूर!'' असे म्हणत खुर्चीवरून उठत सभा संपल्याचे जाहीर केले. 

Web Title: meeting of standing committee over in 12 minutes in nagar