16 मेच्या संपाबाबत राज्य परिवहन कर्मचारी संघटनांची आज बैठक

तात्या लांडगे
शनिवार, 12 मे 2018

राज्य परिवहन कामगारांच्या प्रश्‍नांबाबत सरकारने सकारात्मकता दाखवावी आणि मागण्या मान्य कराव्यात. कर्मचारी संघटना राज्य परिवहन कामगारांच्या प्रश्‍नांवर आता आक्रमक झाल्या असून, सरकारने आता 16 मे रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा संप निश्‍चित आहे.

- संतोष जोशी, विभागीय अध्यक्ष, राज्य परिवहन कर्मचारी संघटना

सोलापूर : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात उद्या (रविवारी) तळेगाव दाभाडे येथे राज्यातील सर्व कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तसेच 16 मे रोजी सरकारने कामगारांच्या हिताचा निर्णय न घेतल्यास सरकारचा निषेध म्हणून संप करण्यात येईल, अशी ठाम भूमिका आता कर्मचारी संघटनांनी घेतली आहे. 

रात्रदिवस कुटुंबापासून दूर राहून प्रामाणिकपणे प्रवाशांची सेवा करणाऱ्या राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून वेतनवाढ व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सातवा वेतन आयोगानुसार वेतन द्यावे यासह विविध मागण्या आहेत. त्यासाठी वारंवार बैठका झाल्या. परंतु, सरकारकडून केवळ आकडेमोड करून कर्मचाऱ्यांच्या मागण्या डावलल्या जात आहेत.

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासमोर कर्मचाऱ्यांच्या अडचणी, प्रश्‍न मांडण्यात आले आहेत. आता त्याबाबत 16 मे रोजी रावते घोषणा करणार आहेत. त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मागण्या डावलून सरकारने एकतर्फी निर्णय जाहीर केल्यास संपाबाबत निर्णय घेण्यात येईल, असा इशारा राज्य परिवहन कर्मचारी संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे. 

 

Web Title: meeting of state transport workers organizations about the strike on May 16