
तासगाव नगरपालिकेचा 133 कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावित विकास कामांचा अर्थसंकल्प, वाचन ही न करता अवघ्या एक मिनिटात एकमताने मंजूर करण्यात आला.
तासगाव, ता. 28 : तासगाव नगरपालिकेचा 133 कोटी रुपये खर्चाचा प्रस्तावित विकास कामांचा अर्थसंकल्प, वाचन ही न करता अवघ्या एक मिनिटात एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते.
तासगाव पालिकेच्या आर. आर. आबा पाटील सभागृहात आज पालिकेची अर्थ संकल्पासाठी सभा बोलविण्यात आली होती. सभेला नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, उपनगराध्यक्षा दीपाली पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, यांच्यासह सत्ताधारी भाजपचे सर्व सदस्य उपस्थित होते. सुरवातीला माजी शिक्षण मंडळ सदस्य चंद्रकांत शिंदे आणि माजी उपनगराध्यक्ष एम. बी. पवार आणि माजी नगराध्यक्ष अशोक पवार यांचे वडील बाबुराव पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सभेला सुरवात होताच पालिकेचा 2019-20 चा सुधारित आणि 2020-21 चा मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी सादर केलेला व स्थायी समिती ने मंजूर करून शिफारस होऊन आलेला 133 कोटी 61 लाख 41 हजार 868 जमा आणि 133 कोटी 58 लाख 26 हजार 615 रुपये खर्चाचा. 3 लाख 15 हजार 253 चा शिल्लकी असलेला सन 2020-2021 चा अर्थ संकल्प कोणतीही चर्चा न करता अर्थसंकल्पाचे वाचन ही न करता मंजूर करण्यात आला.
नागरिकांवर कराचा कोणताही बोजा न टाकणारा असा हा अर्थसंकल्प असल्याचे असे "एक' वाक्य नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांनी उच्चारून सभा संपविण्यात आली. अर्थसंकल्पचे वाचन न झाल्याने पुढील वर्षांसाठी तासगावकरांसाठी विकासाचे काय नवे संकल्प केले आहेत ? अथवा उत्पन्नाशिवाय निधीची काय जादा तरतूद केली आहे? नवे एखादे कोणते काम हाती घेतले जाणार? हे समजू शकले नाही. या शिवाय वृक्षसंवर्धन निधीचा 2020-2021 चा अर्थ संकल्प ही मंजूर करण्यात आला. आजच्या अर्थसंकल्पीय सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक अनुपस्थित होते.