शिवेंद्रसिंहराजेंच्या विराेधात साताऱ्यात गुरुवारी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

गेली पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जावी, अशी मागणी मेळाव्यात केली जाणार आहे. 
 

सातारा : शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे सातारा विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांपासून भाजपसाठी झुंजणाऱ्या काही कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे. त्यातूनच "शिवेंद्रसिंहराजे हटाव, भाजप बचाव' ही भूमिका घेत सातारा विधासभा मतदारसंघातील भाजपचे बूथप्रमुख व विविध पदाधिकाऱ्यांचा गुरुवारी (ता. 29) साताऱ्यात मेळावा होणार आहे. 
2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. त्यातही सातारा विधानसभा मतदारसंघात तर, भाजपकडे उमेदवारचा चेहराही नव्हता. बूथ काय अगदी जिल्हा परिषदेच्या पातळीवरही पक्षाचे कोणतेच नेटवर्क नव्हते. या मतदारसंघातील कोणत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपचे सदस्य नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजेच पयार्याने शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात उभे राहण्याचे धाडसही कोणी करत नव्हते. अशा परिस्थितीत 2014 च्या निवडणुकीला दीपक पवार भाजपकडून सामोरे गेले. त्यांचा पराभव झाला; परंतु त्यानंतर त्यांनी मतदारसंघामध्ये पक्षाच्या बांधणीला वेग दिला. पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या. अगदी मतदारसंघातील 427 बूथपर्यंत बूथप्रमुख व सदस्यांचे संघटन बांधले. त्याच्या जोरावर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपने स्वबळावर लढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये पक्षाला कधीही मिळाले नव्हते, एवढे यश मिळाले. मात्र, पक्षीय पातळीवर या कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा विचार केला गेला नाही. पुढे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश देत असताना मतदारसंघातील कोणालाही विश्‍वासात घेतले नसल्याची भावना हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाली आहे. मनातील ही खदखद पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोचविण्यासाठी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी पक्षाच्या मतदारसंघाच्या कार्यालयासमोर मेळाव्याचे आयोजन केले आहे. मतदारसंघातील सर्व बूथचे पदाधिकारी, सदस्य, युवक व महिला यांसह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. यामध्ये गेली पाच वर्षे पक्षासाठी राबणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जावी, अशी मागणी केली जाणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting will be held against Shivendrasinghraje on thursday