गोविंद पानसरे यांच्या विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवली

गोविंद पानसरे यांच्या विचारांची ज्योत अखंड तेवत ठेवली

प्रश्‍न - संघर्षाची धार कमी झाली की वाढली?
मेघा पानसरे : गोविंद पानसरे यांच्या विचारांचा आवाज जिवंत आहे, हे आम्ही आज चार वर्षांनंतरही दाखविले आहे. विचारांची हत्या होऊ शकत नाही, आम्ही निर्भय आहोत. हे दाखविण्यासाठीच आम्ही प्रत्येक महिन्याच्या वीस तारखेला ‘निर्भया वॉक’ करतो. वीस फेब्रुवारी २०१५ला पानसरे यांची प्राणज्योत मालवली. त्याच दिवसानिमित्त आम्ही निर्भय होण्याचे आवाहन सर्वांना करत आहोत. धर्मनिरपेक्ष लोकशाही टिकविण्याचे आव्हान आपल्याला पेलायचे आहे, एवढंच आम्ही संघर्षातून सांगत आहोत. संघर्षाची धार कमी झाली नाही. जसा वेळ जाईल, तसे कोणत्याही घटनेचे गांभीर्य कमी होते; पण त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संघर्षाची धार आम्ही कमी होऊ दिलेली  नाही. रस्त्यावरील ‘निर्भया वॉक’पासून न्यायालयीन लढाईपर्यंत त्यांचा आवाज जिवंत ठेवला आहे. ‘वैयक्तिक वेदना आणि सामाजिक विवेक’ याला आम्ही निर्भया वॉकने जोडले आहे.

प्रश्‍न - तपासाबाबत समाधानी आहात काय ?
मेघा पानसरे : प्रत्यक्षात महाराष्ट्रातील संशयित आरोपींना कर्नाटकातील पोलिसांनी पकडले. त्यामुळे महाराष्ट्र एसआयटीपेक्षा कर्नाटकातील सीआयडी अधिक क्षमतेने काम करत असल्याचे दिसून येते. विशेष करून पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास जलद गतीने होत आहे. कर्नाटकातील पोलिसांनी पकडलेले आरोपी महाराष्ट्र एसआयटी नंतर ताब्यात घेत आहे. तपास सुरू आहे एवढंच समाधान आहे; मात्र विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास आजही समाधानकारक नाही. त्यामुळे त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी लागली आहे. चौघा विचारवंतांची हत्या झाली आहे. तपासात त्यांच्या हत्येतील गुन्हेगारांचे एकमेकांशी संबंध असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे तपास गुंतागुंतीचा झाला आहे. कट्टर धर्मवाद्यांकडून हत्या झाल्याचे तपासात पुढे येऊ लागले आहे. म्हणून तपासाबाबत पूर्णपणे समाधानी आहे, असे नाही; पण तपासाचा प्रयत्न सुरू आहे. तपास यंत्रणेवरही उपद्रवी लोकांचा दबाव असल्याचे जाणवते.

प्रश्‍न - विचारवंतांच्या हत्येच्या गुन्हेगारांचा परीघ वाढतोय काय?
मेघा पानसरे : हत्येसाठी वापरलेली वाहने, कॉमन इंटेन्शन आणि संशयित आरोपींचे संबंध यांतून एकाच यंत्रणेतून विचारवंतांच्या हत्या झाल्याचे दिसून येते. हत्या घडवून आणणारी यंत्रणा आंतरराज्य गुन्हेगारीशी संबंधित आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोव्यासह इतर राज्यांचा संदर्भ या गुन्हेगारीत येत आहे. गुन्ह्याचे स्वरूप हे गंभीर, गुंतागुंतीचे आणि विशाल आहे. ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. संशयित आरोपींना अटक करून थांबून चालणार नाही. त्यांना शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले पाहिजेत.
  
प्रश्‍न - तुमचा संघर्ष कुठंपर्यंत पोहोचला ?
मेघा पानसरे : महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, गोवा, केरळ, ओरिसा यांसह इतर राज्यांत आम्ही (मुक्ता दाभोलकर) फिरत आहोत. अनेक ठिकाणी पानसरे, दाभोलकर यांच्या तैलचित्रांचे अनावरण केले आहे. निर्भय बनण्यासाठी इतर राज्यांतूनही आम्हाला पाठिंबा मिळत आहे. आम्ही नेहमीच निर्भय बनण्यासाठी सर्वांना आवाहन करीत आहोत. घाबरून चालणार नाही, उपद्रवी लोकांची भीती मोडण्याचे काम करत आहोत. निर्भया वॉकच्या माध्यमातून आम्ही शहराच्या वेगवेगळ्या भागांत फिरत आहोत. कोणी सहभागी होत नसले, तरीही आमचा आवाज ते ऐकत आहेत. घाबरून गप्प बसायचे नाही, निर्भय बनायचे असे आवाहन करत आहे. समाजातील जे विवेकी लोक आहेत, त्यांचा आवाज दबता कामा नये, यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com