धनंजय मुंडे म्हणतात, 'अब की बार, मोदी की हार'

Member of the Maharashtra Legislative Council Dhananjay Munde criticized Narendra Modi
Member of the Maharashtra Legislative Council Dhananjay Munde criticized Narendra Modi

करकंब (जि. सोलापूर) : साडेचार वर्षापूर्वी महागाईचा बाऊ करत जनतेच्या भावनेशी खेळून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारच्या काळात डाळी, पेट्रोल, गॅस, आदी जीवनावश्यक वस्तुंमध्ये दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे. त्यामुळे जनतेने आता 'अब की बार, मोदी की हार' म्हणत सत्तापरिवर्तन केले पाहिजे, असे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. 

आज भोसे (ता. पंढरपूर) येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, बळीराम साठे, आमदार बबनदादा शिंदे, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार राजन पाटील, सरपंच सुधामती कोरके, प्रभाकर देशमूख, रमेश बारसकर, मंदाताई काळे, अजिंक्यराणा पाटील, माजी महापौर मनोहर सपाटे, जयमाला गायकवाड, उमेश पाटील, आप्पासाहेब कोरे, आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुंडे यांनी मोदी सरकारच्या कारभारावर चौफेर टीका केली. सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचा आभास निर्माण करुन दरवर्षी देशातील दोन कोटी युवकांना नोकऱ्या व प्रत्येक व्यक्तिच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याचे आमिष दाखविले. मात्र सत्तेत आल्यानंतर चार वर्षे सात महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी या शासनाने एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याने त्यांना आता सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे मत मुंडे यांनी व्यक्त केले.  

यावेळी राजन पाटील यांनी सांगितले, 'राज्यातील भाजपाच्या शासनास उजनी धरण एकशे तेरा टक्के भरुन देखील योग्य नियोजन करता आले नाही, त्यामुळे आज पाणीपातळी पंचवीस टक्क्याच्या खाली आली आहे.

आमदार बबनदादा शिंदे यांनी, 'एक क्विंटल साखर उत्पादनासाठी सदोतीसशे रुपये खर्च होत असताना साखरेला दर मात्र केवळ एकोणतीसशे रुपये दिला जात आहे. त्यामुळे एफरापी प्रमाणे दर देता येत नाही. त्यासाठी शासकीय मदतीची गरज असताना शासन उदासीन असल्याने सत्तापरिवर्तन आवश्यक असल्याचे' सांगितले.

'पुन्हा एकदा उजनीतून मराठवाड्याला पाणी देण्याचे नियोजन होत असताना कृष्णा-भिमा स्थिरीकरण योजना पूर्ण होणे गरजेचे असल्याचा पुनरुच्चार विजयसिंह मोहिते-पाटील यांनी केला. यावेळी दीपक साळुंखे यांचेही भाषण झाले. 

राष्ट्रवादीच्या सभेत मोदींची भाषणे :
यावेळी अध्यक्षस्थानावरुन बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले भाषण करताना 2014 च्या निवडणूक प्रचारसभेत मोदींनी केलेल्या घोषणांच्या व्हिडीओ क्लीप दाखविल्या. त्यातून प्रत्यक्षात मात्र मोदींनी कोणतीही परिपूर्ती केली नसल्याचे सांगत मोदी शासनाचा खोटारडेपणा सप्रमाण लोकांना दाखवून दिला.

त्यामध्ये प्रामुख्याने 'आप मुझे चौकीदार बनाओ, मै देश की रक्षा करुंगा' हे आश्वासन देतानाची क्लिप दाखवून बँकांची कोट्यावधी रुपयांची कर्जे बूडवून परदेशात पळालेल्या लोकांची यादी दिली.

याशिवाय प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करु, सत्तेत आल्यावर पहिल्याच मिटिंगमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करु, दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देवू, मोदींच्या आदी घोषणांच्या व्हिडीओ क्लीप दाखविण्यात आल्या.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे पन्नास टक्केपेक्षा जादा आरक्षण देताच येत नाही, असे ठामपणे सांगणाऱ्या मोदी शासनाने दिशाभूल करत सवर्णांसाठी न टिकणारे दहा टक्के आरक्षण दिल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय नितीन गडकरी, अमित शहा, भाजपाचे आमदार राम कदम यांच्याही काही व्हिडीओ क्लिप दाखवून भाजपा सरकार जनतेची कशी दिशाभूल करत आहे, हे श्री.पाटील यांनी दाखवून दिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेत भाजपा नेत्यांची भाषणे हा चर्चेचा विषय बनला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com