पत्राच्या रुपाने पु. लं नी केले ह्दयात घर

सुनील शेडगे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

"पु.ल हे श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक होते. त्यांनी मराठी वाचकांना आपल्या लेखणीने भुरळ पाडली. त्यांचे पत्र हे माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे." 
 - राजेंद्र बोबडे, प्राथमिक शिक्षक - कासाणी ता. सातारा.  

नागठाणे  (जि. सातारा) : पु. ल. देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व. पु. लं च्या जन्मशताब्दी वर्षास नुकताच प्रारंभ झाला आहे. त्या अनुषंगाने राजेंद्र बोबडे या सातारा तालुक्‍यातील प्राथमिक शिक्षकाने 'पु.लं'नी 25 वर्षांपूर्वी पाठविलेल्या पत्राची आठवण आजही तितक्‍याच अगत्याने जपून ठेवली आहे.

'सकाळ'चे माेबाईल अॅप डाऊनलाेड करा 
 
'पु. लं'च्या व्यक्तिमत्वाला कैक पैलू होते. ते मराठीतील सिद्धहस्त लेखक. विनोदी साहित्यिक. नाटककार, अभिनेता, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक अन्‌ संगीत दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी आपली ख्याती निर्माण केली होती. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व म्हणूनही त्यांची ओळख आहे. आठ नोव्हेंबरपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ झाला आहे.

आमचे भाई आजाेबा !
 
या पार्श्वभूमीवर राजेंद्र बोबडे या प्राथमिक शिक्षकाने 'पु. लं'नी त्यांना पाठविलेल्या पत्राची आठवण आजही जपून ठेवली आहे. श्री. बोबडे हे कासाणी (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. अगदी आरंभीपासून त्यांनी वाचनाचा छंद जोपासला आहे.

पु. ल. हे त्यांचे आवडते लेखक. श्री. बोबडे सांगतात, "सातारा येथील क्रांतिस्मृती डी. एड. कॉलेजचा मी विद्यार्थी. त्या दिवसांत वाचनाची अफाट आवड होती. कॉलेजच्या ग्रंथालयात 'पु.लं.' ची अनेक पुस्तके होती. ती भराभर वाचून संपविली. त्यातील 'वंगचित्रे' हे पुस्तक मला विशेषत्वाने भावले. पु. ल. बंगाली भाषा कसे शिकले याचे त्या पुस्तकात छान किस्से होते.

त्या काळी मला पत्रमैत्रीचाही छंद होता. मी या पुस्तकाबाबतचा अभिप्राय 'पु.लं'ना पत्राने कळविला. त्यानंतर काही दिवस गेले. मग त्यांच्याच हस्ताक्षरातील पत्र मला आले. एवढया थोर साहित्यिकाचे पत्र पाहून मला जणू आभाळ ठेंगणे झाले. आजही हे पत्र मी प्राणपणाने जपून ठेवले आहे." श्री. बोबडे यांच्या संग्रहात अशा आणखीही साहित्यिकांची पत्रे संग्रहित आहेत.

राज्य नाटय स्पर्धा 18 नाेव्हेंबर ते एक जानेवारीदरम्यान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Memories Of P L Deshpande Remains Wtih His Letter