कोरोनामुळे हरवले मानसिक स्वास्थ्य... साडेसहा टक्के जणांच्या मानसिक आरोग्याच्या तक्रारी 

Mental health lost.jpg
Mental health lost.jpg

सांगली-  कोरोना आपत्तीनंतरच्या टाळेबंदीनंतर जिल्ह्यातील नऊ तालुक्‍यात 9 हजार 85 कुटुंबातील 45 हजार जणांचे नमुना सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये 2856 जणांचे मानसिक स्वास्थ्य हरवल्याने विविध तक्रारींना सामोरे जात असल्याचे दिसून आले. हे प्रमाण लोकसंख्येच्या सुमारे साडेसहा टक्के आहे. मानसिक आरोग्याच्या तक्रारींचे विश्‍लेषण केल्यास 84 टक्के जणांमध्ये चिडचिडेपणा-आक्रमकता, जवळपास 55 टक्के जण भीती आणि अकारण काळजी तर 46 टक्के व्यक्तींत एकाकीपणा अशा प्रमुख तक्रारी दिसून आल्या. 

जिल्हा प्रशासन व शुश्रुषा संस्थेच्यावतीने आधी नमुना सर्व्हे करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील दहा तालुक्‍यातील नमुना कुटुंबाशी मानसतज्ज्ञांनी संवाद साधून फॉर्म भरून घेतले. 18 मे ते 2 जून दरम्यान ही मोहिम राबवण्यात आली. त्यातून ज्यांच्यात मानसिक आरोग्याच्या गंभीर तक्रारी आढळल्या अशा 2856 जणांचा डाटा तयार करण्यात आला आहे. या सर्वांची वैद्यकीय उपचाराची गरज निश्‍चित करून त्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांकडे देण्यात आली आहे. मानसिक आरोग्याच्या या सर्व तक्रारी सकृतदर्शनी असल्या तरी त्यामागे काही वैद्यकीय कारणे आहेत का याबाबतही योग्य वैद्यकीय उपचारांची गरज शोधण्यात येणार आहे. 

या सर्व्हेंनंतर जिल्ह्यात व्यापक सर्व्हेक्षणाचा भाग म्हणून हेल्पलाईन सेवाही सुरु केली आहे. कोरोना आपत्तीविरोधात लढण्याची उमेद निर्माण करण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. यावर रोज सरासरी शंभरावर नागरिक संवाद साधत आहेत. यातून कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्नाबाबतची माहिती पुढे येत आहे. गेल्या आठवड्यामध्ये तीनशेंवर लोकांनी मानसिक आधार व मदतीची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने वृद्ध आहेत. नमुना सर्व्हेक्षण आणि हेल्पलाईन उपक्रमातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारे जिल्ह्यात निरंतर अशी मानसिक आरोग्य उपचाराची व्यवस्था उभी करण्यासाठी प्रशासनाला दिशा मिळावी अशी अपेक्षा आहे. यासाठी संस्थेने जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना याबाबतचा सविस्तर अहवाल सादर केला आहे. 

विविध विकार आणि रुग्णसंख्या 

मानसिक विकार जडलेले 1614 स्त्रिया व 1242 पुरुष आढळले. त्याचे विश्‍लेषण असे. तक्रारीचे स्वरुप, रुग्ण संख्या व कंसात टक्केवारी ः भिती, थकवा अकारण काळजी-1575 (55.1 टक्के), चिंता,ताण-1187 (41.56), अपराधीपणा-49 (1.7 टक्के), एकाकीपणा, असह्यतेची भावना-1325 (46.39),मानसिक गोंधळाची स्थिती-512 (17.92), चिडचिडेपणा, राग राग करणे-2417 (84.62), कमी आत्मविश्‍वास-261 (9.1), सतत वाईट स्वप्ने पडणे - 366 (12.87), उदासपण, अस्वस्थतता-1758 (61.6), निराशा-416 (14.6 ), दुःखी-323 (11.3), एकाग्रतेचा अभाव-305 (10.67), नकारात्मक विचार-552 (19), आत्मघाती विचार 91 (3.2), भ्रम व भास होणे-93 (3.3), थकवा-669 (23), भूकेच्या तक्रारी-661 (23), श्‍वसनाचा त्रास-152 (5.3), डोकेदुखी-601 (21), बेशुध्द होणे-88 (4), कमी झोप-169 (5.6), हातपाय थरथरणे -445 (16), वारंवार घाम फुटणे- 262 (9.2)  


जिल्हाधिकाऱ्यांनी महापूर, कोरोना आपत्तीदरम्यान मानसिक आरोग्याबाबत प्रबोधन, हेल्पलाईन असे उपक्रम राबवले. त्यातून आलेले निष्कर्ष पाहता समुपदेशनाच्या सक्षम व्यवस्था तालुकास्तरावर उभ्या कराव्या लागतील. आनंददायी जगण्यासाठी योग-व्यायाम दिनचर्या व्यवस्थापनासाठी मदत गट तयार करणे अशा प्रमुख शिफारसी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवालाद्वारे केल्या आहेत. 
- कालिदास पाटील, कार्याध्यक्ष, राज्य मानसतज्ज्ञ असोशिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com