‘मेरुलिंग’वर ‘माळीन’चे सावट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

रस्त्यावर चिखल, माती, दगड!
रस्त्यावर चिखल माती, दगड आल्याने वाहने स्लीप होऊन मोठा अपघात होण्याचा संभव आहे. मोठी दुर्घटना होण्याअगोदर बांधकाम विभागाने रस्त्यावरील माती धुऊन काढावी, तसेच सरकारी जागेवर होत असलेले उत्खनन त्वरित थांबवावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.

सायगाव - मेरुलिंग घाट पायथ्याला चाहूर व केंजळ ही गावे वसली आहेत. या घाट डोंगरात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होत आहे, की हा डोंगर केव्हाही ढासळून माळीनसारखी दुर्घटना होऊ शकते. उत्खननाबाबत ग्रामस्थांनी विरोध केला होता; परंतु तो विरोधही मावळला असल्यामुळे तडजोड झाली काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.

मेरुलिंग घाटात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून, त्याकडे प्रशासनाचे बिलकूल लक्ष नाही. रस्त्याकडेला होत अससेल्या उत्खननामुळे रस्त्यावर माती आली आहे. त्यात खाणीतून दगड काढले जात असल्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे. एकीकडे रस्त्यावर माती असताना दुसरीकडे दगड पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविताना कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

संबंधित उत्खनन हे रस्त्याच्या कडेला म्हणजे सरकारी हद्दीमध्ये होत आहे. इतर रस्त्यावर साध्या चरी जरी काढल्या तरी संबंधित शेतकरी वर्गावर नोटीस काढून त्यांना दंड करणारे बांधकाम अधिकारी याबाबत मात्र बघ्याची भूमिका का घेत आहेत हा मोठा प्रश्न आहे, तसेच गावातील रस्ता खुला करण्यासाठी अनेक प्रयत्न करूनसुद्धा यश येत नाही; परंतु घाटामध्ये मनमानीपणे कोठूनही कोठेही उत्खनन करून रस्ते काढले जात आहेत. या घटनेकडे दुर्लक्ष करण्यासाठी मात्र अधिकाऱ्यांनी नक्कीच आर्थिक उलाढाल केली असावी, अशी शंका उत्पन्न होत आहे.

आनेवाडी विभाग या रस्त्यामुळे तालुक्‍याच्या मुख्यालयाशी जोडला आहे. मुलांच्या शैक्षणिक कागदपत्रासाठी, बाजारासाठी, शासकीय कामांसाठी ये- जा करायला हा मार्ग सोपा असल्याने सर्वसामान्य जनता स्वतःच्या वाहनाने येत, तसेच या मार्गावरून एसटी महामंडळाच्या बसदेखील ये- जा करीत असतात. 

मुख्य म्हणजे घाटात खासदार, आमदार, नियोजन आदी मधून कोणताही निधी पडलेला नाही, तसेच रस्त्याचे काम सुरू नाही, तरीही रस्त्याचे दुरुस्ती काम सुरू असल्याचा फ्लेक्‍स बोर्ड लावून बांधकाम विभाग कोणासाठी पायघड्या घालतेय, असा प्रश्न निर्माण होत आहे. स्वतःचे पोट भरण्यासाठी ‘साहेबां’ची नामी शक्कल आहे, असेच म्हणावे लागेल. कारण अपघात झाला तर आम्ही बोर्ड लावला, असे सांगता येईल ना! या फ्लेक्‍स बोर्डबाबत एकाही नेत्याने अधिकाऱ्यांना विचारण्याची तसदी घेतली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meruling Ghat Danger Malin Accident Care