म्हसवडला स्वच्छतेसाठी सरसावल्या तनिष्का

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

म्हसवड - स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत येथील तनिष्का आता स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोचवणार असून, त्यासाठी पालिकेच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

म्हसवड - स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत येथील तनिष्का आता स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोचवणार असून, त्यासाठी पालिकेच्या सहकार्यातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. 

स्वच्छ महाराष्ट्र मोहीम राबविण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, स्वच्छता समितीच्या सभापती हिंदमालादेवी राजेमाने, तनिष्का गटप्रमुख प्रा. कविता म्हेत्रे, ‘सकाळ’चे मुख्य उपसंपादक संजय शिंदे, तनिष्का व्यवस्थापक लक्ष्मण चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात म्हसवड शहर स्वच्छ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरले. शहरातून स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी फेरी काढण्यात येणार असून, त्यामध्ये तनिष्कांसह पालिका कर्मचारी, शाळांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्वच्छतेचे फलक तयार करुन शहरात लावण्यात येणार आहेत. २६ जानेवारीला स्वच्छतेबाबत पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेबाबत निबंध व वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. मुलांना लहान वयापासून स्वच्छतेचे धडे देण्यासाठी तनिष्का व्याख्यानाच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. 

नगराध्यक्ष वीरकर म्हणाले, ‘‘म्हसवड स्वच्छ व सुंदर करण्यासाठी तनिष्कांसोबत हातात झाडू घेऊन उपक्रमांना पालिका सर्व सहकार्य करेल. पालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचाऱ्यांचा स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग असेल.’’

मुख्याधिकारी पाटील म्हणाले, ‘‘पालिका प्रशासन स्वच्छतेच्या मोहिमेत पुढाकार घेणार आहे. या मोहिमेत शहारातील युवक मंडळे, सामाजिक संस्था व विद्यार्थ्यांनाही सामावून घेण्यात येईल.’’  

प्रा. म्हेत्रे म्हणाल्या, ‘‘स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोचवण्यासाठी तनिष्का जनजागृती करतील. संक्रांतीनिमित्त तनिष्का स्वच्छतेचा वाणवसा घेतील. त्यामुळे महिलांच्या माध्यमातून घराघरांत स्वच्छतेचा संदेश पोचण्यास मदत होईल.’’ 

राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारने स्वच्छ महाराष्ट्र मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत सकाळ माध्यम समूहाच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या सक्रिय योगदान देणार आहेत, असे श्री. शिंदे यांनी सांगितले. 
या वेळी पाणीपुरवठा सभापती व तनिष्का सविता म्हेत्रे, अर्चना रसाळ, दीपाली काळे, प्रतिभा पालसांडे, जयश्री नरळे, गीतांजली शेटे, वैशाली गोंजारी, मोनिका म्हेत्रे, शुभांगी पोळ, पूनम म्हेत्रे, सरिता भिवरे आदी तनिष्का उपस्थित होत्या.

 

Web Title: mhaswad cleaning by tanishka