महेतांचा राजीनामा घेऊनच चौकशी करावी- पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी चव्हाण येथे आले होते. मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

नगर : ""गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी घोटाळा केला म्हणूनच चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली; पण आधी त्यांचा राजीनामा घ्यावा, मगच चौकशी करावी,'' अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

माजी खासदार दादा पाटील शेळके यांच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमासाठी चव्हाण येथे आले होते. मराठा मोर्चात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.
चव्हाण म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "ना खाऊंगा, ना खाने दूँगा' अशी घोषणा करून सत्ता मिळविली; मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते गैरव्यवहार करत आहेत. एकनाथ खडसे, प्रकाश महेता यांचे घोटाळे बाहेर आले. अजून काही मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत. महेता यांनी गैरव्यवहार केला म्हणूनच सरकारने चौकशीची घोषणा केली. पदावर असल्यावर पारदर्शक चौकशी होणार नाही. त्यासाठी आधी त्यांना पदावरून दूर करा.''

""राज्य सरकारची कर्जमाफी द्यायची तयारीच नव्हती; पण शेतकऱ्यांच्या व विरोधी पक्षांच्या दबावामुळे कर्जमाफी द्यावी लागली. त्यातही किचकट नियम लावल्याने अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. अजूनही नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार, हे शेतकऱ्यांसह राजकीय लोकांनाही कळत नाही. एवढे पैसे कोठून आणणार, याचे नियोजनही सरकारकडे नाही,'' अशी टीकाही चव्हाण यांनी केली.
""सरकारने जसा शेतकरी आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न मराठा मोर्चाबाबत सुरू आहे. काही लोकांना बोलावून फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे,'' असा आरोप चव्हाण यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांकडे केल्या जाणाऱ्या दुर्लक्षाची किंमत सरकारला मोजावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: midc land scam prakash maheta prithviraj chavan