सांगली मार्केट यार्डात मध्यरात्री थरारनाट्य; 11 लाख लुबाडणारे  चोरटे जेरबंद 

Midnight thriller at Sangli Market Yard; 4 robbers arrested
Midnight thriller at Sangli Market Yard; 4 robbers arrested

सांगली : चोरांच्या टोळीने व्यापाऱ्याचा गळ्याला सुरा लावून अकरा लाख रुपयांची रोकड लुबाडून चोरट्यांनी पोबारा केला. वसंतदादा मार्केट यार्डात शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. चोरटे पळाले, मात्र त्यानंतर जे घडले, ते थरारनाट्य अंगावर शहारे आणणारे होते. सशस्त्र चोरांना मध्यरात्री पोलिस भिडले आणि कोणतीही हानी न होऊ देता, चोरट्यांना जेरबंद केले. 

इसरडे टोळीतील गजानन पंडित इसरडे (वय 28, टिंबर एरिया, भीमनगर) याच्यासह कृष्णा कुटणाप्पा कांबळे (वय 20, दसरा चौक, सांगली), नीलेश प्रकाश आडे (वय 25, आसोला, ता. मानोरा, जि. वाशी), राकेश शामराव कांबळे (वय 26, टिंबर एरिया, सांगली) या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह दोन सुरे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक अजित टिके यांनी दिली. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आनंद नरेंद्र कुलकर्णी (वय 43, विश्रामबाग) यांचा वसंतदादा मार्केट यार्डात प्लास्टिक वस्तूंचा व्यवसाय आहे. काल नेहमीप्रमाणे ते दुकानात होते. रात्री साडेआठच्या सुमारास इसरडेसह चौघेही तेथे आले. त्यांनी प्लास्टिक पिशवीची मागणी केली. त्यानंतर थेट कुलकर्णी यांना सुऱ्याचा धाक दाखवत पैशांची मागणी केली. यावेळी कुलकर्णी यांना मारहाणही करण्यात आली. त्यानंतर कॅश काउंटरमधील दहा लाख 79 हजार 725 रुपयांची रोकड घेऊन चौघेही पळाले. 

कुलकर्णी यांनी चौघांचा पाठलाग केला, मात्र अंधाराचा फायदा घेत चौघेही पळून गेले. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यास कळवण्यात आले. उपाधीक्षक टिके, पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे तत्काळ पथक घेऊन रवाना झाले. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. त्यानंतर श्री. टिके यांनी साऱ्या परिसरात शोध मोहीम राबवण्यास सुरवात केली. एलसीबीच्या पथकानेही तत्काळ घाव घेतली. 

चप्पल अन्‌ पाचशेची नोट 
परिसरात शोध मोहीम सुरू असताना मार्केट यार्डात काही अंतरावर एक चप्पल सापडली. त्यानंतर एका बोळात अंधारात पाचशेची नोट आढळली. यावरून चोरटे याच परिसरात दबा धरून बसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मार्केट यार्डातील एका गोदामात हे चोरटे दिसले. चौघांपैकी तिघेजण त्याठिकाणी अंधारात लपले होते. त्यातील इसरडेसह दोघांच्या हाती सुरा होता. 

धमकी अन्‌ स्टंटबाजी 
पोलिसांनी तिघांनाही पकडण्याचा प्रयत्न सुरू केला. इसरडेसह दोघांनी गळ्याला चाकू लावून स्वतःला मारून घेऊ, अशी धमकी पोलिसांना दाखवली. तासभर त्या तिघांची स्टंटबाजी सुरू होती. पहिल्या टप्प्यात पैसेही त्यांनी खाली टाकून दिले. अखेर एलसीबीचे बिरोबा नरळे, संतोष गळवे, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, नीलेश कदम यांनी तिघांना बोलण्यात गुंग ठेवले. उपाधीक्षक टिके यांच्या सूचनेनुसार साऱ्या परिसराला पोलिसांनी वेढा दिला, अन्‌ तिघांनाही ताब्यात घेतले. हे सारे थरारनाट्य अख्खा परिसर पाहत होता. पोलिसांची सतर्कता आणि नियोजन यामुळे चोरटे पोलिसांच्या हाती लागले. त्यानंतर संशयित कृष्णा यालाही अटक करण्यात आली. 

तीन दिवस कोठडी 
संशयित गजानन इसरडेविरोधात यापूर्वी दरोडा, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, चोरी, लुटमार असे गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत. 2012 मध्ये त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर पुन्हा गुन्हेगारी करत असल्याचे दिसून आले. संशयित राकेश कांबळे याच्याविरोधाही मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. चौघांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

चार दिवस पाळत 
संशयित इसरडे हा चार दिवसांपासून त्या दुकानावर पाळत ठेवत होता. रोकड कधी जमा केली जाते, कुठे ठेवली जाते, असा पूर्ण अभ्यास त्याने केला. त्यानंतर साथीदारांसह त्याने चोरी केल्याचे उपाधीक्षक टिके यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. 

संपादक : युवराज यादव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com