कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 एप्रिल 2019

कोयना धरण परिसरात काल (ता. 28) मध्यरात्री 12 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला.

कोयनानगर - कोयना धरण परिसरात काल (ता. 28) मध्यरात्री 12 वाजून 29 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसला. भूकंपमापन केंद्रावर या भूकंपाच्या धक्‍क्‍याची तीव्रता 3.5 रिश्‍टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. भूकंपाच्या धक्‍क्‍याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून जवळच असलेल्या गोषटवाडी या गावाजवळ होता. 

दिवसभर कडक उन्हाचे चटके सोसून हैराण झाल्याने गाढ झोपेत असलेल्या कोयना व कोकण किनारपट्टीवासीयांना काल मध्यरात्री भूकंपाच्या सौम्य, पण जोरदार बसलेल्या धक्‍क्‍याने जागे केले. भूकंपाच्या सौम्य धक्‍क्‍याने कोयना परिसर व कोकण किनारपट्टी हादरली. भूकंपाच्या धक्‍क्‍याची खोली 11 किलोमीटर खोल, तर भूकंपाच्या धक्‍क्‍याचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 16.8 किलोमीटरवर असलेल्या गोषटवाडी या गावाच्या नैऋत्येस नऊ किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती कोयना प्रकल्पाच्या भूकंपमापन वेधशाळेने दिली आहे. भूकंपाचा हा धक्का कोयना परिसर, पाटण, पोफळी, अलोरे, चिपळूण या परिसरात जाणवला आहे. भूकंपाच्या या धक्‍क्‍याने पाटण तालुक्‍यात कोणत्याही ठिकाणी जीवित अगर वित्तहानी झाली नसल्याचे पाटणचे तहसीलदार रामहरी भोसले यांनी स्पष्ट केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mild earthquake shock in Koyna dam area