#MilkAgitation दुधाचे आंदोलन निर्णायक टप्प्यावर; सुकाणु समितीचे सदस्य अनिल देठे यांची माहिती

सनी सोनावळे
मंगळवार, 17 जुलै 2018

दुध रोखण्याचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असुन, सरकारला नमते घेत सकारात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. अशी माहिती सुकाणु समितीचे सदस्य शेतकरी नेते अनिल देठे यांनी दिली. 

टाकळी ढोकेश्वर - राज्यात दुध उत्पादकांचे दुधदरवाढीसाठी गेली सहा ,सात महिन्यांपासून आंदोलने सुरु आहेत. परंतु खासदार राजु शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलै पासुन सुरू केलेले दुध रोखण्याचे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असुन, सरकारला नमते घेत सकारात्मक निर्णय घ्यावा लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. अशी माहिती सुकाणु समितीचे सदस्य शेतकरी नेते अनिल देठे यांनी दिली. 

आंदोलनाचे अतिशय सुनियोजन व अधिवेशन काळातच होत असलेलं आंदोलन या खासदार शेट्टींसाठी जमेच्या बाजु आहेत. कारण राज्यभर स्वाभिमानीचे कार्यकर्ते व दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले असुन पुर्णपणे दुधसंकलन थांबविले आहे.तसेच लपुन छपुन जरी दुधाचे टँकर नेण्याचा प्रयत्न झालाच तर त्या टँकरला अडवण्याचे किंबहुना प्रसंगी तो फोडण्याचे धाडस ही कार्यकर्ते दाखवत असल्याने दुधाचे टँकर नेण्याची जोखीम पत्कारण्याची भुमिका कुणी दुध संस्था घेताना दिसत नाही.

गुजरातमधुन येणारे अमुलचे दुध ही या वेळेला रोखण्यात बऱ्यापैकी यश आल्याचे दिसत आहे व जे टँकर मुंबईकडे आले होते ते पालघरमध्ये स्वतः खासदार राजु शेट्टींनी आडवत माघारी परतवले आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी मुंबईला दुधाचा तुटवडा जरी जाणवला नसला तरी तो आता १०० % जाणवणार यात शंका नाही. दरम्यान विधानसभेत नि विधानपरिषदेत हि विरोधी पक्षाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यात सुरू असलेल्या दुध आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आग्रह धरला आहे.यामुळे सरकारची सभागृहात हि चांगलीच कोंडी झाल्याचे दिसत आहे. सरकार आज संध्याकाळपर्यंत शेट्टींना चर्चेस बोलवून काहि तरी तोडगा काढण्याची शक्यता आहे.तथापि सरकारची चोहोबाजुंनी कोंडी करण्यात खासदार शेट्टी व दुध उत्पादक शेतकरी यशस्वी झाले आहेत.

सरकारने जरी मागण्या मान्य केल्या नाहीत तरी राज्यातील शेतकऱ्यांनी अजुन थोडे दिवस होणारा तोटा व त्रास सहन करत हे आंदोलन तेवत ठेवावे कारण परत एवढे प्रभावी व व्यापक आंदोलन करणे शक्य होणार नाही. कारण आता ज्या पध्दतीने नियोजन करण्यात आले व शेतकरी बांधवांनी ही साथ दिलीय ती अप्रतिम आणि वाखाणण्याजोगीच आहे. खरतरं हा लढा फक्त पाच रूपये अनुदान पदरात पाडुन घेण्यापुरताच मर्यादित न राहता खासगि दुध संस्थाकडुन एका टँकरचे दोन टँकर टोन्ड दुध तयार करण्याचा व त्यातुन लाखो रूपयांची नफेखोरी कमावण्याचा गोरख धंदा सुरू आहे.त्यावर हि कुठे तरी लगाम घालण्याची गरज आहे.कारण जो पर्यंत हे विषारी टोन्ड दुध निर्माण होण्याचे थांबणार नाही तो पर्यंत अतिरिक्त दुधाचे प्रमाण कमी होणार नाही व शेतकऱ्यांच्या दुधाला हि चांगला दर मिळणार नाही. हे सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. खासगि दुध संस्थाचालकांचे व राजकारण्यांचे अर्थपुर्ण लागेबांधे असल्यामुळेच सरकार दुधाच्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन निर्णय घेण्याचे धाडस दाखवत नाही. त्यामुळे अशाच प्रकारे व्यापक लढा उभारूनच सरकारला झुकवावे लागणार यापेक्षा वेगळा पर्याय कुठलाच नाही. तुर्तास सध्याच्या आंदोलनातुन जेवढे मिळेल तेवढे पदरात पाडुन घेणेच शहाणपणाचे ठरेल.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk Agitation is at important stage said sukanu committee member Anil Dethe