सोन्या बैलाची कमाल, एकटाच पोचवतो डेअरीवर दूध (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

एकटा चालत जाऊन २०० लिटर दूध पोचवणारा बैल पाहिलाय? हा बघा व्हिडिओ 
आज प्रामाणिकपणा, निष्ठा याबाबी कमी होतायत. पण निष्ठेने कसं काम करायचं हे शिकायचं असेल तर  ‘सोन्या बैल’ हे एक मूर्तिमंत उदाहरण.

सांगली : गाडीत दुधाचे कॅन ठेवल्यावर बैलाला निघण्याचा इशारा केला, की तो रस्त्याच्या एका बाजूनं चालायला लागतो... रहदारीचा रस्ता, रस्त्यावरून वेगानं येणाऱ्या गाड्या. पण, कोणत्याही गाडीला अडचण न करता हा बैल एकटाच गप गुमानं चालत राहतो... आपल्या ठरलेल्या मार्गानं बैल दुधाचे कॅन डेअरीवर सुखरूप पोच करतो... तेव्हा धन्याच्या चेहऱ्यावरही एक वेगळे समाधान असतं..होय हे सर्व एका बैलाच्या बाबतीत आपण बोलतोय आणि त्याचे नाव आहे सोन्या.

आजच्या घडीला माणसावरही विश्वास ठेवणं तसं अवघड...पण, सोन्या बैल 3 किलोमीटर दूर जाऊन 200 लिटर दूध डेअरीवर घालतोय. गेली 7 ते 8 वर्षे मालकाची निरपेक्ष सेवा करतोय.

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काळमवाडी हे साडे चार हजार लोकसंख्येचं गाव...याच गावात शिवाजी साळुंखे हे शेतकरी राहतात.10 एकर शेती आणि गाई म्हैशी अशी एकूण 40 जनावरं...दिवसाला 200 लिटर दूधाचं उत्पन्न...शिवाजी साळुंखेंची 4 मुलं शेती कामास मदत करतात...त्यात सोन्या बैलही मुलांप्रमाणं त्यांना कामात मदत करतो. सोन्याचं मालकावरील प्रेम पाहून अनेकांना त्याचं कौतुक वाटतं. डेअरीवर दूध घालायला सोन्या कधी येतोय याचीच वाट गावकरी पाहत असतात. एखाद्या दिवशी सोन्या गावात आला नाही तर त्याची चर्चाही गावात होते.

आज प्रामाणिकपणा, निष्ठा याबाबी कमी होतायत. पण निष्ठेने कसं काम करायचं हे शिकायचं असेल तर  ‘सोन्या बैल’ हे एक मूर्तिमंत उदाहरण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milk on the dairy without the owner

टॅग्स