दूध, खाद्यतेल होणार अधिक पौष्टिक

दूध, खाद्यतेल होणार अधिक पौष्टिक

कोल्हापूर - दूध, तसेच खाद्यतेलांत जीवनसत्त्वाचा (व्हिटॅमिन) समावेश करण्याची मुभा उत्पादक, तसेच व्यावसायिकांना मिळणार आहे. लोकांचे आरोग्य अधिक सुधारावे, कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी फॉर्टिफाईड (पौष्टिक) दूध, तेलाची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार आहे. 

यासंबंधी अन्न, औषध प्रशासन विभागाची कार्यशाळा उद्या (ता. १८) पुणे येथे होत आहे. कोल्हापूरसह, सांगली, सातारा, सोलापूर तसेच पुण्यातील दूध उत्पादक, सहकारी, खासगी दूध संघांचे प्रतिनिधी, पॅकिंग व्यावसायिक कार्यशाळेत सहभागी होणार आहेत. अन्नसुरक्षा कायद्यानेच अशा प्रकारच्या विक्रीला संरक्षण दिले आहे. जीवनसत्त्व (व्हिटॅमिन) तसेच खनिजे (मिनरल्स) यांचे दूध अथवा खाद्यतेलांत बाहेरून मिश्रण करता येणार आहे. अन्न, औषध विभागाने त्याची मात्रा निश्‍चित केली आहे. पॅकिंगमधील विक्रीवेळीही ‘एफ’ असा ठळकपणे उल्लेख करावा लागणार आहे. 

जीवनसत्त्व अथवा खनिजांच्या अभावामुळे प्रकृतीवर परिणाम होतो. जीवनसत्त्व कमी पडल्यानंतर लहान मुलांना कोवळ्या उन्हात बसविण्याचा सल्ला दिला जातो. दूध, तसेच खाद्यतेल ही घरोघरची गरज आहे. थेट स्वयंपाक खोलीशी संबंधित दोन्ही पदार्थ असल्याने त्यात जीवनसत्त्व, खनिजांचा समावेश केल्यास लोकांना पौष्टिक असे घटक मिळतील असे अन्न, औषध विभागाचे म्हणणे आहे. परदेशांत अशा फॉर्टिफाईड दुधाची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात आले.

राज्यात पश्‍चिम महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन अधिक आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुधामुळे धवलक्रांती झाली आहे. पूर्वी गवळी घरोघरी दूध घालत होते. नंतर पॅकिंगमधील दूध घेण्याची सवय अंगवळणी पडली. गोकुळ, वारणासारख्या दूध संघांनी या व्यवसायात क्रांती केली. कोल्हापूर जिल्ह्याला पुरेल इतक्‍या दुधाचा पुरवठा करून मुंबईच्या काही भागांचे मार्केटही गोकुळने ताब्यात घेतले आहे. दूध पौष्टिक मानले जाते. ते अधिक पौष्टिक व्हावे यासाठी त्यात जीवनसत्त्व, तसेच खनिजांचा समावेश केला जाणार आहे.

खाद्यतेलाच्या पूर्वी गिरणी होत्या. चांगल्या तेलासाठी गिरणीतूनच ते खरेदी करण्याचा एकवेळ ट्रेंड होता. नंतर वेगवेगळ्या पॅकिंगमध्ये ते उपलब्ध झाले. यात जीवनसत्त्व तसेच खनिजांचा समावेश झाल्यास आरोग्यास फायदा होणार आहे.

दूध उत्पादक, तसेच व्यावसायिकांना आम्ही जी मात्रा निश्‍चित करून दिली आहे, त्यानुसार पोषक द्रव्यांचा समावेश करता येईल. यामुळे कुपोषणाचे प्रमाण कमी होईल. जीवनसत्त्व, खनिजांअभावी वैद्यकीय खर्च वाढतो, तोही कमी होण्यास मदत होईल. पुणे येथे उद्या (ता. १८) शनिवारी (ता. १९) खाद्यतेलाचे उत्पादक, पॅकेजिंग व्यावसायिकांसाठी कार्यशाळा होत आहे.
- मोहन केंबळकर,
सहाय्यक आयुक्त, अन्न-औषध प्रशासन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com