दूध भुकटी उद्योग संकटात ; शेतकऱ्यांना वाढीव दराची प्रतीक्षाच

तात्या लांडगे
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

राज्यात शासनाचे तीन आणि अन्य 31 असे एकूण 34 भुकटी प्रकल्प आहेत. जागतिक बाजारात दर पडल्याने सध्या राज्यासह देशात लाखो टन भुकटी विक्रीविना पडून आहे. भुकटी प्रकल्प अडचणीत आल्याने शेतकऱ्यांना वाढीव दर देणे सहकारी दूध संघांसाठी अडचणीचे ठरत आहे. 

- सतीश मुळे, व्यवस्थापकीय संचालक, सोलापूर जिल्हा दूध संघ

सोलापूर : दूध व दुग्धजन्य पदार्थांची देशांतर्गत गरज भागवून शिल्लक दुधापासून भुकटी बनविली जाते. परंतु, सद्यःस्थितीत महाराष्ट्रात 30 हजार टन तर देशात दोन लाख टन अतिरिक्‍त भुकटी विक्रीविना पडून असल्याचे दुग्ध विभागाकडून सांगण्यात आले. भुकटी निर्मितीची स्थिती नाकापेक्षा मोती जड अशी झाली आहे. भुकटी निर्मितीसाठी 200 रुपयांचा खर्च अन्‌ जागतिक बाजारात भुकटीचा दर 120 रुपये प्रतिकिलो आहे. त्यामुळे भुकटी उद्योग अडचणीत आला असून शेतकऱ्यांना वाढीव दराची अद्यापही प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे राज्यभरात चित्र पाहायला मिळत आहे.

जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश असलेल्या भारतात मागील चार वर्षांपासून दरवर्षी दूध उत्पादनात सरासरी पाच ते सहा टक्‍के वाढ होत आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या एक कोटी 32 लाख लिटर दुधाचे संकलन असून त्यातील सुमारे 40 लाख लिटर दूध शिल्लक राहते. 

आकडे बोलतात... 

देशाचे दूध उत्पादन 
176.35 दशलक्ष टन 
महाराष्ट्राचे दूध उत्पादन 
1.32 कोटी लिटर 
देशातील शिल्लक भुकटी 
2.03 लाख टन 
महाराष्ट्रातील अतिरिक्‍त भुकटी 
30,349 मे.टन 
भुकटी निर्मितीचा दर (प्रतिकिलो) 
190-200 रुपये 
जागतिक बाजारातील दर 
120 रुपये

Web Title: The milk powder industry is in Difficulties