दुधातले काळे बोके शोधणार - सदाभाऊ खोत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

सांगली - विदर्भ, मराठवाड्यातील दूध संघ गाईच्या दुधाला प्रतीलिटर १८ रुपये द्यायचे. त्यांना आता पाच रुपयांचे अनुदान मिळाल्यावर २५ रुपये दिले पाहिजेत. सांगली-कोल्हापुरात संघ २३ रुपये द्यायचे, आता त्यांनी पाच रुपये वाढवून म्हणजे २८ रुपये दिले पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या दूधसंघवाल्यांनी मिळून सरकारी तिजोरीवर डल्ला मारलाय, हे स्पष्ट होईल. मी स्वतः या पांढऱ्या दुधातील काळे बोके शोधून काढेन, असा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ‘राजारामबापू’ आणि खासदार राजू शेट्टी यांच्या ‘स्वाभिमानी’ दूध संघांवर त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. ते म्हणाले,‘‘देश व राज्यातील दूध दराच्या स्थितीविषयी मी स्वतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांना भेटून निवेदन दिले होते. जगभरात हा प्रश्‍न होता आणि अतिरिक्त दूध, भुकटीचे पडलेले दर यामुळे कोंडी झाली होती. राज्य सरकारने त्याचा विचार करून पाच रुपयांचे अनुदान  देण्याचे ठरवले आहे. हे पैसे देताना राजारामबापू, वारणा, गोकुळ अशा दूध संघांकडून प्रतीलिटर २३ रुपये दिले जात  होते. आता ही मंडळी तोटा सहन करून देत होतो, असा कांगावा करतील. तसे असेल तर त्यांनी तोटा भरून काढायला आंदोलन केले का? की शेतकऱ्यांसाठी केले. जर शेतकऱ्यांसाठी केले असेल तर २८ रुपये द्यावेत. अन्यथा, वरचे तीन रुपये दूध संघांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी जाताहेत हे स्पष्ट होईल. मी मुख्यमंत्र्यांना सांगून त्या तीन रुपयांची चौकशी लावेन.’’

राजू शेट्टींचा नामोल्लेख टाळत ते म्हणाले,‘‘उसाची एफआरपी दोनशे रुपयांनी वाढली आहे. याआधी एवढी वाढ कधी झाली नव्हती. कदाचित, आंदोलन करणाऱ्यांना ही वाढ होईल, याची माहिती नसावी. त्यामुळे त्यांचा अंदाज चुकला.’’

टेंभूच्या लाभक्षेत्रात ठिबक अनुदान देऊ
काँग्रेसचे आमदार विश्‍वजित कदम आणि भाजपचे  जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात टेंभू सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील ठिबक अनुदान बंद केल्याच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत सदाभाऊंना याविषयी प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले,‘‘अनुदान बंद झालेले नाही, तसा अध्यादेश असेल तर मुख्यमंत्र्यांशी बोलून तो बदलता येईल. येथे ठिबकला अनुदान कायम राहील.’’

Web Title: milk rate sadabhau khot