#MilkAgitation शिल्लक दुधाचं करायचं तरी काय?

शैलेन्द्र पाटील
शुक्रवार, 20 जुलै 2018

सातारा - जिल्ह्यात दररोज सरासरी २३ ते २४ लाख लिटर दुधाचे संकलन होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे दूध संघांना मागणीप्रमाणे पुरवठा करता येत नाही. आंदोलनाच्या भीतीने ग्रामीण भागातील दूध संकलन बंद आहे. त्यामुळे लहान-मोठे व्यावसायिकांना दूध मिळत नाही. ग्रामीण भागात शाळांत, पाहुण्यांत दूध वाटून झाले, चक्काही केला, त्यातूनही शिल्लक राहिलेल्या दुधाचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा आहे.

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला तोंड फुटले आणि ग्रामीण भागातून जवळच्या शहरांत दूध पुरवठा करणारे मार्ग बंद झाले. गोपालक शेतकरी व शेवटचा ग्राहकामध्ये संकलन केंद्रचालक, संकलन डेअरी चालक, दूध संघ आदी कमिशन एजंटांची मोठी साखळी आहे. या साखळीमुळेच दुधाचा दर वाढत जातो. आंदोलन सुरू झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी शिल्लक दुधाचं करायचं काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे आहे. ‘स्वाभिमानी’च्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंध केला आहे. तरीही खंडाळ्याच्या बोगद्याजवळ दूध टॅंकरवर दगड पडल्याने टॅंकर वाहतूकदार, दूध संघ धोका पत्करायला तयार नाहीत. नुकसानीपेक्षा टॅंकर उभा राहिला तरी चालेल, अशी त्यांची भूमिका आहे. काही ठिकाणी चोरी-छुपे डेअरीला दूध घातले जात आहे. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. 

ग्रामीण भागातून संकलित केलेले दूधच पुढे डेअरी चालकांकडून पिशव्यांत बंद करून शहरात पाठवले जाते. अत्यल्प संकलनामुळे पिशवीतील दुधावर परिणाम झाला आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, मलकापूर शहरांमध्ये कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती आहे. शहरात आज पिशवीतील दूध कमी पडू लागले आहे. रोजच्या ग्राहकाला मागणीच्या ५० टक्के पिशवीतील दूध आज दिले गेले. दुधाशिवाय हॉटेल व्यवसाय चालू शकत नाहीत. त्यामुळे नेहमीच्या रतिबाचे हॉटेल चालक, अमृततुल्य, चहा टपरीवाले यांना प्राधान्याने पिशवीतील दूध दिले जात आहे. शहरांजवळील शेतकरी थेट ग्राहकाला दूध घालतात. त्यांच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम नसला तरी हे प्रमाण एकूण मागणीच्या अत्यल्प आहे. 

एका खासगी डेअरी चालकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की ‘‘शेतकरी आज दूध घालण्याच्या मनस्थितीत आहे. सेंटर चालकांचे व शेतकऱ्यांचेही फोन येताहेत. परंतु, वाहतूकदार धोका पत्करायला तयार नाहीत. वाहनांच्या तोडफोडीच्या बातम्या आहेत. तोडफोडीची जबाबदारी कोणी घ्यायची, असं त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी स्थिती आहे.’’

आज काही लोक स्वत: धोका पत्करून डेअरीत दूध घालत आहेत. तेवढीच डेअरीची रोजची आवक आहे. रोज पॅकिंगच्या एक हजार पिशव्या जातात, आज या लोकांना मागणीच्या प्रमाणात आम्ही दूध देऊ शकत नाही. 
- खासगी डेअरीचालक, सातारा 

Web Title: #MilkAgitation Remaining milk problem farmer