या पक्षी अभयारण्यात होतेय लाखोंची लूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

ब्रिटिशकालीन मायणी तलावात वास्तव्यास येणाऱ्या फ्लेमिंगोंसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांमुळे तलाव व परिसरातील अभयारण्य प्रसिद्ध पावले. सामाजिक वनीकरण विभागाने  निर्माण केलेले हे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य छोटे असले, तरी राज्यभर त्याचा लौकिक आहे. तलावात स्वच्छंदपणे विहार करणारे विविध जातींचे पक्षी पाहण्यासाठी राज्यभरातून येथे निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक व पर्यटक येत असतात. 

मायणी (जि. सातारा) : येथील इंदिरा गांधी पक्षी अभयारण्यातील चंदनाच्या झाडांची वारंवार कत्तल केली जात आहे. त्याकडे वनविभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. चंदन चोरट्यांवर कारवाई होत नसल्याने ते सैराट होत अधिक सक्रिय झाले आहेत. अभयारण्यातील वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी संवेदनशीलतेने व जागरूकतेने पार पाडण्याची आवश्‍यकता आहे.

 

 

ब्रिटिशकालीन मायणी तलावात वास्तव्यास येणाऱ्या फ्लेमिंगोंसह विविध प्रजातींच्या पक्ष्यांमुळे तलाव व परिसरातील अभयारण्य प्रसिद्ध पावले. सामाजिक वनीकरण विभागाने रोजगार हमीच्या कामाद्वारे जाणीवपूर्वक निर्माण केलेले हे इंदिरा गांधी पक्षी अभयारण्य छोटे असले, तरी राज्यभर त्याचा लौकिक आहे. तलावात स्वच्छंदपणे विहार करणारे विविध जातींचे पक्षी पाहण्यासाठी राज्यभरातून येथे निसर्गप्रेमी, पक्षीनिरीक्षक व पर्यटक येत असतात. त्यांच्यासाठी येथे पर्यटक निवासस्थाने उभारली आहेत. 

बालकांसाठी खेळणीही

पक्षी निरीक्षणासाठी तलावालगत अभयारण्यात मनोरे उभारले आहेत. पक्ष्यांचे सूक्ष्म निरीक्षण करता यावे, यासाठी खास दुर्बिणी उपलब्ध करून दिल्या आहेत. छोटेखानी बाग तयार करून बालकांसाठी खेळणीही ठेवली आहेत. पाण्याची सोय केली आहे. त्यासाठी शासनाने कोट्यवधींचा निधी खर्ची घातला आहे. मात्र, वारंवार अभयारण्यातील झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घातले जात आहेत. विशेषतः तेथील चंदनाची झाडे हेरून कापली जात आहेत. त्याची तस्करी करून चंदन चोरटे माया गोळा करत आहेत. 

प्रवेशद्वारापासून 100 मीटरवर तोड

सध्या तलाव ओसंडून वाहत असून, अनेक स्थानिक नागरिक ठिकठिकाणचे निसर्गप्रेमी पर्यटक तलाव व अभयारण्यात परिसरात हजेरी लावत आहेत. त्यामुळे सतत लोकांची वर्दळ आहे. वनविभागाचे कर्मचारी तेथे निवासी आहेत. अभयारण्यातून जाणाऱ्या मल्हारपेठ व मायणी- म्हसवड रस्त्यांवरही लोकांची वर्दळ असते. मुख्य प्रवेशद्वारांपासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील चंदनाची झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 

 

औषधी वनस्पतींनी अभयारण्य समृद्ध

सीसीटीव्हीसारख्या उपाययोजना करण्याची गरज अभयारण्यातील झाडांवर चालणाऱ्या त्या कुऱ्हाडी थांबण्यासाठी वनविभाग आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यासाठी अज्ञात ठिकाणी सीसीटीव्हीसारख्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे, तरच दुष्काळी भागातील ही जाणीवपूर्वक वाढवलेली वनराई सुरक्षित राहणार आहे. तिचे संवर्धन होणार आहे. चंदनासारख्या अन्य औषधी वनस्पतींनी अभयारण्य समृद्ध होणार आहे.

निपचित पडलेले चोरटे पुन्हा सक्रिय 

दरम्यान, गेल्या काही वर्षांत निपचित पडलेले चंदन चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अभयारण्यासह ठिकठिकाणची चंदनाची झाडे रातोरात चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनीही त्याबाबतीत योग्य ती दक्षता घेणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Millions of plunder were being held in this bird sanctuary