शेकडो सोलापुरकरांनी बनविले हजारो सीड बॉल!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

कार्यशाळेत सहभागी झालेल्या पर्यावरणप्रेमींनी सीड बॉल बनविण्यासाठी लिंबोळ्या, चिंचोके, वड, पिंपळ, टरबूज आणि कलिंगडाच्या बिया, बहावा, शेवग्याच्या बिया आणल्या होत्या. लहान मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिकही सीड बॉल बनविण्याच्या कार्यशाळेत उत्साहाने सहभागी झाले होते.

सोलापूर : माती, शेण आणि पाण्याचे मिश्रण केले...चिखलाचे गोळे करून त्यात विविध फळ बिया घातल्या...हाताने गोल आकार देऊन बनविले सीड बॉल..! रविवारी सकाळी स्मृती वन उद्यानात हा उपक्रम घेण्यात आला. इको फ्रेंडली क्‍लब आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत शेकडो सोलापूरकरांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यशाळेत सहभागी झालेल्या पर्यावरणप्रेमींनी सीड बॉल बनविण्यासाठी लिंबोळ्या, चिंचोके, वड, पिंपळ, टरबूज आणि कलिंगडाच्या बिया, बहावा, शेवग्याच्या बिया आणल्या होत्या. लहान मुले, महिलांसह ज्येष्ठ नागरिकही सीड बॉल बनविण्याच्या कार्यशाळेत उत्साहाने सहभागी झाले होते. माती आणि शेण समप्रमाणात घेऊन एकजिव करण्यात आले. त्यात विविध देशी झाडांच्या बिया घालून छोट्या बॉलसारखे गोळे तयार करण्यात आले. नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे प्रमुख भरत छेडा, इको फ्रेंडली क्‍लबच्या सदस्या स्वाती इंगळे, समन्वयक परशुराम कोकणे यांनी सीड बॉल बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. 

वाळलेले सीड बॉल निसर्ग भ्रमंती, ट्रेकींग आणि सहलीदरम्यान टाकण्यात येणार आहेत. हे बॉल फुटून बियांना अंकुर येईल आणि त्या रोपांचे झाडात रुपांतर होईल अशी ही संकल्पना असल्याचे इको फ्रेंडली क्‍लबचे सदस्य संजीवकुमार कलशेट्टी यांनी सांगितले. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनअधिकारी सुवर्णा माने यांनी तेरा कोटी वृक्ष लागवड अभियानाची माहिती दिली.

निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने कृतीशील होण्याचे आवाहन केले. इको फ्रेंडली क्‍लबचे उपाध्यक्ष भाऊराव भोसले यांनी स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापनाची माहिती दिली. यावेळी वृक्षमित्र बाबूराव पेठकर, सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी संजय भोईटे, शीतल बडबडे, नेचर कॉन्झर्वेशन सर्कलचे पप्पू जमादार, अमोल मिस्कीन, संतोष धाकपाडे, ऍड. स्वप्नाली चालुक्‍य, मोनिका माने, सरस्वती नारायणकर, संतोष धाकपाडे, शुभम अक्षंतल, ऍड. मंजुनाथ कक्कळमेली आदी उपस्थित होते.

Web Title: Millions of seed balls created by Solapur