Vidhansabha2019 : भाजप राज्यात स्वबळावर १७० जागा जिंकेल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

२८८ मतदारसंघांची तयारी
शिवसेना आणि भाजप युती असली, तरीदेखील भाजपने २८८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे.

कोल्हापूर - राज्य सरकारने केलेली विकासकामे, मराठा आरक्षणाला आलेले यश, या गोष्टी लक्षात घेता भाजप राज्यात स्वबळावर १७० जागा जिंकेल. पक्षाने केलेल्या पाहणीत हे ठळकपणे दिसते, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. असे असले तरीदेखील आपण युती करूनच लढायचे आहे. त्यामुळे मनात शंका ठेवू नका, असेही त्यांनी सांगितले. यावेळी संघटन सचिव व्ही. सतीश उपस्थित होते. सदर बाजार येथून भाजप सदस्य अभियानाला सुरवात झाली. रामकृष्ण हॉल, मार्केट यार्ड येथे हा शक्तिकेंद्रप्रमुख मेळावा झाला.

दरम्यान, यानिमित्ताने भाजपने २८८ विधानसभा मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे. युती असली, तरीदेखील महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघात, केंद्रात भाजपची ताकद वाढवा, असा आदेशही दिला.

व्ही. सतीश म्हणाले, ‘‘लोकसभेतले भाजपचे यश हे कार्यकर्ता व संघटन बांधणी यांतून मिळाले. विधानसभेला सामोरे जाताना सर्व समाज व सामान्य जनता यांना पक्षाबरोबर जोडण्याचे काम सर्वांनी करावे; तसेच पक्ष विचारधारा, शिस्त याकडे लक्ष द्यावे.’’
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘सध्याचा काळ भाजपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. सदस्य नोंदणी व नव मतदारनोंदणी याविषयी ताकदीने काम करावे. जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तयार राहावे.’’  ९ ऑगस्टला सदस्य नोंदणी, १ ते १० ऑगस्ट शक्तिसन्मान रक्षाबंधन कार्यक्रम व १६ ऑगस्टला भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रथम स्मृतिदिन यांसह अनेक विषयांबद्दल त्यांनी सूचना दिल्या. 

जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी आभार मानले. प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, पश्‍चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, आमदार अमल महाडिक, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, महानगर सरचिटणीस विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, ग्रामीण संघटन सरचिटणीस बाबा देसाई, जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व राज्य लेखा समिती अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन उपस्थित होते. दरम्यान, आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले त्यामुळे पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली.

२८८ मतदारसंघांची तयारी
शिवसेना आणि भाजप युती असली, तरीदेखील भाजपने २८८ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक मतदारसंघात पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न पक्षाने सुरू केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची फळी उभी केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Chandrakant Patil comment