पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा

पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा तात्काळ सुरू करावा

सांगली - पूरबाधित क्षेत्रात विद्युत यंत्रणा, पाणीपुरवठा योजना तात्काळ सुरू करा. रोगराई पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा. लोकांचे जीवन सुरळीत करण्यासाठी आवश्यक सर्व निधी, मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाईल. लोकांच्या गरजा लक्षात घेवून यंत्रणांनी आराखडे तयार करावेत व तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीबाबत सर्व यंत्रणांचा आढावा घेताना ते बोलत होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी राज्यमंत्री सुरेश धस, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता एच. व्ही. गुणाले, विशेष कार्य अधिकारी रविंद्र खेबुडकर यांच्यासह सर्व यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

श्री. महाजन म्हणाले, पूर ओसरल्यानंतर येणाऱ्या संभाव्य रोगराईला अटकाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तात्काळ गतीमान करा. पूरबाधित क्षेत्रातील लोकांच्या रक्त चाचण्या घ्या, स्वच्छतेसाठी यंत्रणा राबवा, औषध फवारणी करा. याबरोबरच स्वच्छ व शुद्ध पाणी पिण्यास मिळेल याची सर्वतोपरी दक्षता घ्या. फिल्टरेशन प्लँटवरील स्वच्छ पाणीच टँकर्सव्दारे लोकांना पिण्यासाठी उपलब्ध करून द्या. आवश्यक त्या सर्व ठिकाणी टँकर्स तात्काळ सुरू करा, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जनावरांचे पंचनामे व लसीकरण यासाठी खाजगी, सरकारी, पशुवैद्यकीय कॉलेजमधील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येईल,

श्री. महाजन म्हणाले, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सर्व बाधित रस्त्यांच्या सुधारणांसाठी तात्काळ प्रस्ताव द्या. 125 गावांमधील पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. पूर ओसरल्यानंतर संकलित झालेला कचरा, मैला यांचे कंपोस्टींग वैज्ञानिक पध्दतीने करा. मृत जनावरांची योग्य विल्हेवाट लावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

श्री. महाजन म्हणाले, दोन दिवसांपेक्षा जास्त घर पाण्यात बुडाले असल्यास अथवा घर वाहून गेले असल्यास कपडे व भांड्यांसाठी शहरी भागात 15 हजार रुपये तर ग्रामीण भागात 10 हजार रुपये मदत करण्यात येईल. तसेच, प्रति कुटुंब 10 किलो तांदुळ, 10 किलो गहु देण्यात येईल. छावणीमध्ये आश्रय न घेतल्यास प्रौढ व्यक्तिंसाठी 60 रुपये तर लहान बालकांसाठी 45 रुपये प्रमाणे दैनंदिन भत्ता देण्यात येईल.

पूरबाधित क्षेत्रातील घरांचे पंचनामे तात्काळ करा. बाधित गावातील कुटुंबांची माहिती गावनिहाय, नावनिहाय तयार करा. निराश्रीत झालेल्या सर्वांना शासनाची मदत देण्यात येईल. ज्यांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट झाले आहे, अशांना मदत देण्यासाठी नवीन परिमाणे निश्चित करण्यात येतील

- प्रवीण परदेशी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त

परदेशी म्हणाले, घरांचे पंचनामे करताना त्यांचे तीन भागांमध्ये वर्गीकरण करण्यात यावे. 2005 व 2019 च्या पूरस्थितीत जे घर पाण्याखाली गेले आहे, ज्या घरांची पडझड झाली आहे, ज्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे अशा तीन वेगवेगळ्या गटांमध्ये पंचनाम्यांचे वर्गीकरण करण्यात यावे. ज्यांची घरे परत वापरता येण्यासारखी नाहीत अशांसाठी कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी आराखडे तयार करावेत. तसेच सातत्याने बाधित होणाऱ्या घरांमधील कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी कायमस्वरूपी निवारा केंद्रे उभी करण्यासाठी आराखडे तयार करावेत. तसेच ग्रामीण व शहरी भागातील नुकसानीचे पंचनामे व याद्या करण्यासाठी यंत्रणा गतीमान करावी. शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांशिवाय, इंजिनिअरींग कॉलेज, आयटीआय, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, आजअखेर सांगली जिल्ह्यात 22 व्यक्ती मृत असून 1 बेपत्ता व 2 जखमी आहेत. ब्रम्हनाळ दुर्घटनेत एकूण 17 व्यक्ती मयत झाल्या आहेत. 39 जनावरे मृत असून वाळवा तालुक्यात 3 हजार 200 कोंबड्या मृत झाल्या आहेत. पिकांचे नजरअंदाजित नुकसान 144 गावांमधील 54 हजार 545.50 हेक्टर क्षेत्रावरील झाले आहे. महावितरणच्या 94 बाधीत गावांमध्ये 13 कोटी 62 लाख रूपयांचे तर सार्वजनिक बांधकामकडील 484 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे 186 कोटी 25 लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. अशी माहिती प्रशासनातर्फे या बैठकीत देण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com