जखमी शेतकऱ्याला सहकार मंत्र्यांनी केली मदत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

शेतकऱ्यांचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सोलापूरला पाठविले. 

सोलापूर - होनमुर्गी फाट्याजवळ अपघातातील जखमी शेतकऱ्याला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मदत केली. सहकार मंत्री देशमुख हे निंबर्गी येथे नियोजित कार्यक्रमासाठी निघाले होते, शेतकऱ्यांचा अपघात झाल्याचे दिसल्यानंतर त्यांनी वाहन बाजूला घेतले. स्वत:च्या वाहनातून जखमी शेतकऱ्याला उपचारासाठी सोलापूरला पाठविले. 

भीमाशंकर यल्लप्पा कंगारे (वय 55, रा. होनमुर्गी ता. दक्षिण सोलापूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. कंगारे हे गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दुचाकीवरून भाजी घेऊन निघाले होते. चारचाकी वाहनाने मागून धडक दिल्याने ते खाली पडले. जखम झाल्याने रक्त येत होते. त्याच वेळी निंबर्गीच्या दिशेने सहकार मंत्री देशमुख यांचे वाहन निघाले होते. देशमुख यांनी लगेच स्वत:चे वाहन देऊन जखमी भीमाशंकर कंगारे यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठविले. शासकीय रुग्णालयात फोन करून जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्‍टरांशी संवाद साधला. मंत्री असल्याची किंवा कोणीतरी दुसरे अपघातग्रस्ताला बघेल ही भावना मनात न आणता स्वत: देशमुख यांनी सहकार्य केल्याबद्दल जमलेल्या गावकऱ्यांनी आभार मानले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The minister helped the injured farmer