मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपनं शिवसेनेला गंडवल्यानेच... 

Minister Musharraf said, 'BJP is troubling Shiv Sena
Minister Musharraf said, 'BJP is troubling Shiv Sena

नगर : पालकमंत्री हसन मुश्रीफ पहिल्यांदाच नगरला आले होते. त्यांनी कुकडी पाणीप्रश्‍न, जिल्ह्यातील नियोजनाचा आढावा तसेच विविध बैठका घेतल्या. साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरही त्यांनी भाष्य केले. सर्वांनाच श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला दिला. भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाबाबत गंडवल्यानेच त्यांना आज हे दिवस आले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

श्रद्धा आणि सबुरी 
शिर्डी साईबाबांच्या जन्मस्थळावरून सध्या सुरू असलेल्या वादासंदर्भात पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, याबाबत साईबाबांनी दिलेल्या श्रद्धा, सबुरीची सर्वांनीच लक्षात घ्यावी, आपले मत काय असे विचारले असता, तुम्हालाच जास्त माहिती असेल, तुमचे याबाबत मत काय, असा मिश्‍किल सवाल त्यांनी पत्रकारांनाच विचारला. 

आमच्या कोल्हापुरात असंच चालतं.. 
मुश्रीफ हे धुरंधर शरद पवारांचे पक्के अनुयायी असल्याचा प्रत्यय दौऱ्यात आला. चुतरस्र अन्‌ मोजके बोलणारे शरद पवार परिचित आहेत. मुश्रीफ यांचेही बोलणे, वागणे मुरब्बी राजकारण्याचे दिसले. के. के. रेंजबाबत विचारलेल्या प्रश्‍नांबाबत विचारले असता, मला याची माहिती घेऊ द्या, अशी प्राजंल कबुली त्यांनी दिली. तर नियोजन बैठकीत पत्रकारांच्या प्रवेश बंदीबाबत बोलताना कोल्हापुरातही अशीच पद्धत आहे. बैठक झाल्यानंतर माहिती सांगितली जाते, असे सांगून मुश्रीफ शेजारी बसलेल्या माजीमंत्री पाचपुते यांना म्हणाले, हे आमच्या पक्षाचे नेते होते. त्यांच्याच काळात ही प्रथा राज्यभर पडली, असे सांगत बैठकीत हशा पिकवला. आता दर महिन्याला जिल्ह्यात आढावा बैठक आपण घेणार असल्याचा निर्वाळा दिला. 

यावेळी आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, आशुतोष काळे, नीलेश लंके, किरण लहामटे, निर्मला मालपाणी, प्रताप ढाकणे, चंद्रशेखर घुले, क्षितिज घुले, विनित पाऊलबुधे, कुमार वाकळे, संजीव भोर आदी उपस्थित होते. 

बॅकलॉग राहणारच नाही... 
जिल्ह्याच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्‍नांसोबत नियोजन समितीच्या बैठकीत रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण या संदर्भातल्या एकही बॅकलॉग तीन वर्षांत शिल्लक राहणार नाही. जिल्ह्यात तब्बल एक हजार शाळेच्या खोल्यांची कमतरता असल्याचे ऐकून आश्‍चर्य वाटले. जिल्ह्यातील विकासाची प्रक्रिया गतिमान केली जाईल, पालकमंत्री या नात्याने राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून जिल्ह्याचा विकास गतिमान करू, अशी ठाम ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. 

जिल्हा नियोजन समितीची बैठक नियोजन भवनात पार पडली. यावेळी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आदींसह आमदार उपस्थित होते. 


मुश्रीफ म्हणाले, 27 जानेवारी पूर्वी जिल्हा नियोजनच्या बैठका घेऊन आराखडे पाठविण्याच्या सूचना राज्याच्या अर्थविभागाकडून देण्यात आल्या. सत्ता स्थापनेच्या घडामोडीत बराच काळ गेला. त्यामुळे जिल्ह्यात येण्यास उशिर झाला. ही वस्तुस्थिती आहे. मात्र, आज झालेल्या बैठकीत जिल्हा नियोजनचा आराखडा मंजूर करण्यात आला. अखर्चित राहिलेल्या निधीचे पुनर्नियोजन करण्यात आले. 

जलयुक्त शिवार, छावण्यांतील गैरव्यवहाराची चौकशी 
मागील सरकारच्या काळात चारा छावण्या, पाणी पुरवठ्याचे टॅंकर, जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार आमदार रोहित पवार यांनी जिल्हा नियोजनच्या सभेत केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

थेट सरपंच निवडीला विरोधच 
देश आणि देशाची निवड प्रक्रिया आणि व्यवस्था राज्यघटनेवर चालते, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि महापौर सभागृहातील सदस्यच करतात. असे असताना सरपंच व नगरपालिकांचे नगराध्यक्ष यांची निवड थेट जनतेतून करण्याचा घाट घातला गेला. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या काळात हा निर्णय झाला. त्यास सर्वप्रथम आपणच विरोध केला. आता सरपंचांची निवड जनतेतून होण्याऐवजी सदस्यांतून होईल, तसा शासन निर्णय लवकरात-लवकर निघावा, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

कुकडी कालवा दुरुस्तीचा सर्व्हे 
कुकडी कालवा दुरुस्तीसंदर्भात लक्ष वेधले असता, मुश्रीफ म्हणाले, कुकडी कालव्या अंतर्गत जिल्ह्यातील मोठे लाभक्षेत्र सिंचनाखाली येते. मात्र, कालव्याच्या नादुरुस्तीमुळे निश्‍चित असलेले पाणी पुरेशा दाबाने पोहचू शकत नाही. ही बाब आपल्या निदर्शनास आली आहे. याबाबत तत्काळ सर्व्हे करण्याचे निर्देश कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले आहे. हे काम तत्काळ मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा करू. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com