मंत्री म्हणतात... नगरकरांनो काय होत नाही, घाबरू नका पण सावधगिरी बाळगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

शासन, प्रशासन कोरोनाला आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या आठ दिवसांत कोरोना गुणाकार करणार असला, तरी त्यावर सरकार मात करण्यासाठी खंबीर आहे. मात्र, काही लोक अजूनही अशा अविर्भावात वावरतात, की मला काही होणार नाही, परंतु, हाच खरा धोका आहे,'' असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

नगर ः ""कोरोना व्हायरसने जगभर थयथयाट घातला असला, तरी कोरोनासंदर्भात जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. जिल्हावासियांना कळकळीची विनंती आहे, की संसर्ग टाळणे, हाच एक मात्र उपाय आहे. त्यामुळे जनतेने खबरादारीच्या उपाययोजनेची अंमलबजावणी करून स्वतःच स्वतःचे रक्षक करणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूच्या मुकाबल्यासाठी सरकार गंभीर असून जनतेच्या पाठीमागे खंबीर उभे आहे. जनतेने संयमाने घ्या, बाहेर जाणे टाळा,'' असे आवाहन ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. 

हेही वाचा - कोरोना हरवण्यासाठी नगरकरांनी काय केलं हे...बघा, तुम्हालाही जमेल

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनासंदर्भातील वस्तुस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ""जनतेने जनता कर्फ्यूला चांगला प्रतिसाद दिला. मात्र, हाच प्रतिसाद 31 मार्चपर्यंत अपेक्षीत आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात 144 कलम लागू केला आहे. त्यामुळे जनतेने करणे गर्दी टाळावी. चीननेही कोरोनाबाबतची माहिती दडवून ठेवली. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग जास्त प्रमाणात वाढला आहे.

वेळीच काळजी घेतली असती, तर ही परिस्थिती ओढवली नसती. सर्व ठिकाणी धार्मिक स्थळांमध्ये देवही बंद झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनतेनेही घराची सीमा ओलांडू नका, विज्ञान यावर नक्कीच मात करेल. कोरोना संदर्भात खबरदारी म्हणून शहरातील बडीसाजन, शासकीय कॉलेज आदी ठिकाणी कक्ष स्थापन करण्यात येईल. अन्नधान्य, औषधांचा जिल्ह्यात मुबलक साठा आहे. अन्नधान्य साठवून ठेवण्याची गरज नाही.'' 

मला काहीच होत नाही; हाच खरा धोका 
""शासन, प्रशासन कोरोनाला आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे. येत्या आठ दिवसांत कोरोना गुणाकार करणार असला, तरी त्यावर सरकार मात करण्यासाठी खंबीर आहे. मात्र, काही लोक अजूनही अशा अविर्भावात वावरतात, की मला काही होणार नाही, परंतु, हाच खरा धोका आहे,'' असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

कोरोना मीटर 
261 व्यक्तींची तपासणी 
2 पॉझिटिव्ह 
196 निगेटिव्ह 
02 अहवाल येणे बाकी 
256 जण "होम क्वॉरंटाईन' 
03 जिल्हा रुग्णालयात निगराणीखाली 

चला फिरायला, हे बंद करा 
""कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने अत्यावश्‍यक सेवा वगळता पूर्ण राज्यात लॉकडाउन केले आहे. जनता कर्फ्यूला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर शहर पूर्ण रिकामे आहे, म्हणून काही लोक फिरताना आढळत आहे. त्यामुळे शहर रिकामे आहे, चला फिरायला, हे बंद करा, अन्यथा प्रशासनाला कारवाईचा बडगा उगारावा लागेल,'' असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. 

...तर कारवाई अटळ 
""कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून खासगी वाहन वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे जनतेला कळकळीचा विनंती आहे, की कोणीही खासगी वाहन घेऊन फिरू नये, अन्यथा वाहन वापरल्यास कारवाई अटळ आहे,'' असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले. 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Musharraf says Dont be afraid of the townspeople