... तर मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल: रणजीत पाटील

Ranjit Patil
Ranjit Patil

पंढरपूर : महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वीस, पंचवीस वर्षे पुढचा विचार केला तर वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईमध्ये होणारी गर्दी पहाता भविष्यात कदाचित मंत्रालय देखील मुंबई बाहेर नेले जाईल. गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी नवी मुंबई जवळ नियोजनबध्द असे "नयना" हे नवीन शहर वसवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आज येथे पत्रकारांच्या सोबत बोलताना दिली. 

पंढरपूर नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभासाठी डॉ.पाटील हे आज पंढरपूर दौऱ्यावर आलेले असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. 

डॉ. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात शहरीकरण सर्वाधिक वेगाने होत आहे. वाढती लोकसंख्या आणि दक्षिण मुंबईतील गर्दी पाहता भविष्यात कदाचित मंत्रालय मुंबई बाहेर न्यावे लागेल.  चंदीगड, नवी मुंबई प्रमाणे "नयना" नावाचे नवीन शहर वसण्यात येत आहे. त्याचे काम सुरु झाले आहे असे त्यांनी नमूद केले. 

पंढरपूरचा विकास करताना स्थानिक नागरिकांचा विचार केला जात नाही. पंढरपूर शहरात सुमारे 81 कोटी रुपये खर्च करुन ठिकठिकाणी स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत. परंतु ती वापरा अभावी धूळखात पडून आहेत. सध्या घाटाचे काम देखील चूकीच्या पध्दतीने बांधले जात आहे. भाविकांचे सामान ठेवण्याची सोय व्हावी यासाठी बांधण्यात आलेल्या लॉकर रुम देखील अयोग्य ठिकाणी बांधल्यामुळे त्यांचा वापर होत नाही. विकास कामे होत असताना योग्य नियोजन नसल्यामुळे शासनाचे कोट्यावधी रुपयांचा निधी वाया जात आहे अशा प्रकारच्या अनेक तक्रारींचा पाढा पत्रकारांनी नगरविकास राज्यमंत्री श्री.पाटील यांच्या पुढे वाचला. तेंव्हा या तक्रारी ऐकून श्री.पाटील यांनी अनेक कामे पुढील वीस, पंचवीस वर्षाचा विचार करुन केली जात आहेत. पंढरपूरच्या इतिहासात कधी नव्हे एव्हढा निधी या चार वर्षाच्या काळात शासनाने पंढरपूरसाठी दिलेला आहे. पूर्वी केवळ घोषणा होत होत्या आता प्रत्यक्ष कामे होत आहेत. ही कामे होत असताना काही त्रुटी असतील तर त्याची दखल घेऊन निश्‍चित सुधारणा केल्या जातील. निधी योग्य कामासाठी आणि काळजीनेच खर्च केला जाईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 

या प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक, श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष संजय वाईकर उपस्थित होते. 

कॅनडा सरकारच्या मदती बद्दल मंत्री अनभिज्ञ
कॅनडा सरकारकडून पंढरपूरच्या विकासासाठी कमी व्याज दरात सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात मागील आषाढी यात्रेत सुतोवाच केले होते. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. काही महिन्यापूर्वी कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज्‌ यांनी देखील या संदर्भात पंढरपूरचा दौरा केला होता. परंतु पुढे काहीच झालेले नाही या विषयी विचारलेल्या प्रश्‍नाला डॉ.पाटील यांनी या विषयाची आपल्याला माहिती नसल्याचे सांगून अनभिज्ञता व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com