शहरातील कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यास पालकमंत्री जबाबदार: चंदनशिवे

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 11 मे 2018

सोलापूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास खुद्द पालकमंत्री विजय देशमुख हेच जबाबदार आहेत. त्यांची भूमिका ही कायम दलितविरोधी आहे, असा आरोप महापालिकेतील बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला. दरम्यान, या संदर्भात श्री. देशमुख यांची बाजू घेण्यासाठी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला, परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. 

सोलापूर - शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्यास खुद्द पालकमंत्री विजय देशमुख हेच जबाबदार आहेत. त्यांची भूमिका ही कायम दलितविरोधी आहे, असा आरोप महापालिकेतील बहुजन समाज पक्षाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केला. दरम्यान, या संदर्भात श्री. देशमुख यांची बाजू घेण्यासाठी मोबाईलवर वारंवार संपर्क साधला, परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. 

श्री. चंदनशिवे म्हणाले, "संभाजी भिडे यांच्या सभेसाठी पालकमंत्र्यांनी मैदान उपलब्ध करून दिले, त्यामुळे पोलिसांना नाईलाजाने सभेसाठी परवानगी द्यावी लागली. ज्या व्यक्तीमुळे महाराष्ट्रातील वातावरण गढूळ झाले, त्या व्यक्तीच्या सभेसाठी मैदान उपलब्ध करून देऊन पालकमंत्र्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे.''

दलित वस्ती योजनेबाबत बैठका घेण्यात त्यांना रस नाही. एकूणच त्यांची भूमिका दलित विरोधी आहे. त्यामुळे भाजप, शिवसेनेतील दलित नगरसेवकांना एकत्रित आणून पालकमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहे. दलित वस्त्यांच्या योजनेसाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र तो खर्ची केला जात नाही, असे श्री. चंदनशिवे म्हणाले. 

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व नागरी सुधार योजनेतील प्रस्तावित कामे जाणीवपूर्वक स्थगित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 2017-18 या कालावधीत 18 कोटी रुपये तरतूद होती. त्यापैकी 10 कोटी मंजूर झाले, आठ कोटी शिल्लक आहे. 2018-19 मध्ये 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दलित वस्ती नसलेल्या भागात कामे सुचविणे, खासगी जागा व जागा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी समाज मंदिर सुचविणे, स्मार्ट सिटीअंतर्गत विद्युत कामे मंजूर असताना पुन्हा कामे सुचविण्यात आली आहेत, असे श्री. चंदनशिवे म्हणाले. या वेळी नगरसेविका ज्योती बमगुंडे, स्वाती आवळे, नगरसेवक गणेश पुजारी उपस्थित होते. 

बसपचे पॅनेल निवडून आल्याचा राग 
भारतात हिंदुत्वाची लाट असताना महापालिकेच्या निवडणुकीत आणि शहर उत्तरमध्ये बसपचे पॅनल निवडून आल्याचा राग पालकमंत्र्यांना आहे. त्यामुळे ते जाणीवपूर्वक दलितांच्या योजनाबाबत उदासीनता दाखवत आहेत, असे श्री. चंदनशिवे म्हणाले. 

Web Title: Minister responsible for disrupting the law and order in the city