...तर राजू शेट्टी राजकारण सोडणार का? : सदाभाऊ खोत यांचे प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

कोल्हापूर - मला सख्खा किंवा चूलत भाऊही नाही, मला किंवा माझ्या भावकीतही कोणाला मुलगी नाही, असे असताना माजी खासदार राजू शेट्टी हे जर माझ्या जावयाने कडकनाथमध्ये फसवणूक केली असे म्हणत असतील तर तो माझा जावई आहे हे सिध्द करून दाखवावे. आपण राजकारण सोडू आणि जर तो माझा जावई नसेल तर श्री. शेट्टी हे राजकारण सोडणार का ? हेही जाहीर करावे, असे प्रत्युत्तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 

कोल्हापूर - मला सख्खा किंवा चूलत भाऊही नाही, मला किंवा माझ्या भावकीतही कोणाला मुलगी नाही, असे असताना माजी खासदार राजू शेट्टी हे जर माझ्या जावयाने कडकनाथमध्ये फसवणूक केली असे म्हणत असतील तर तो माझा जावई आहे हे सिध्द करून दाखवावे. आपण राजकारण सोडू आणि जर तो माझा जावई नसेल तर श्री. शेट्टी हे राजकारण सोडणार का ? हेही जाहीर करावे, असे प्रत्युत्तर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिले. 

इस्लामपूरमध्ये कडकनाथमध्ये झालेल्या गैरव्यवहारात श्री. खोत यांचा जावई असल्याचा आरोप श्री. शेट्टी यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. खोत यांनी या आरोपाबद्दल श्री. शेट्टी यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

ते म्हणाले,"माझे गांव असलेल्या मरळनाथपूरमध्ये लेकरू जन्माला आले की श्री. शेट्टी पाळणा हलवायला येत होते. ते दहा वर्षे मतदार संघाचे खासदार होते. त्यांना अभ्यास पाहीजे होता की, मरळनाथपूर हे 70 टक्के खोतांचे आहे. कोणाची तरी मुलगी कोणाच्या तरी घरात जात असते. याचा अर्थ गावातील सगळ्या मुलींचा बाप मी नाही, पण मानलेला बाप मी आहे. श्री. शेट्टी हे ज्या समाजात जन्माला आले, त्या समाजातील सर्व मुलींचे नवरे हे त्यांचे जावई आहेत का ? का त्यांचा जन्म गोकुळात झाला होता ?' 

श्री. शेट्टी हे कार्यकर्त्यांना कधीच जीवाभावाने ओळखूच शकले नाहीत असे सांगून श्री. खोत म्हणाले,"मी त्यांच्यासोबत 20 वर्षे होतो, त्यामुळे मला भाऊ आहे का ? मुली आहेत का ? हे त्यांना माहिती पाहीजे होते. माझ्या घरच्या सगळ्यांच्या लग्नात ते आलेले आहेत. याचा त्यांनी अभ्यास करायला हवा होता. त्यांना माझा जावई तो असेल तर तो सिध्द करायला पाहीजे, अन्यथा त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार आहे. ना मला भाऊ, मुलगी, चूलत भाऊ. ती मुलगी माझ्या भावकीतीलही नाही. खोतांचे गांव असल्याने त्या मुलीचे माहेरचे नांव खोतच असणार. श्री. शेट्टी यांनी ही माझी मुलगी हे पुराव्यानिशी सिध्द करावे, ते सिध्द झाले तर राजकारण सोडून देतो.' मी सत्याच्या मार्गावर जाणारा कार्यकर्ता असे ते सांगतात, त्यामुळे त्यांनी हे सिध्द नाही झाले तर त्यांनीही राजकारण सोडावे. केवळ स्टंटबाजीसाठी आणि सदाभाऊंचे नांव घेतल्यानंतर मोठ्या बातम्या छापून येतात म्हणून त्यांच्याकडून माझ्यावर टिका केली जाते. विकासात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांनी काम करावे. मी एखादा शब्द बोलला तर तो मागे घेण्याची वेळ माझ्यावर कधीही आलेली नाही, असे श्री. शेट्टी सांगतात तर त्यांनी केलेला आरोप सिध्द करावा, असे आव्हानही श्री. खोत यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Sadabahu Khot answer to Raju Shetti comment