जयंत पाटलांच्या गावातच दिले पावणेसहा कोटी - खोत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादी काँग्रेसने वाळवा तालुक्‍यात मंजूर झालेल्या पाणी योजनांचे श्रेय घेऊ नये. मी सांगली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या २२६ योजनांसाठी ४६६ कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

इस्लामपूर - पंधरा वर्षे राज्यात मंत्री असलेल्या जयंत पाटील यांच्या कासेगावमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाच कोटी ७५ लाख रुपये निधी मी पाणीपुरवठा राज्यमंत्री झाल्यावर दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने वाळवा तालुक्‍यात मंजूर झालेल्या पाणी योजनांचे श्रेय घेऊ नये. मी सांगली जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या २२६ योजनांसाठी ४६६ कोटी रुपयांचा निधी आणल्याची माहिती कृषी व पाणीपुरवठा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

राज्यमंत्री खोत म्हणाले, ‘‘वाळवा तालुक्‍यात पाणीपुरवठ्याच्या ३३ योजनांना मंजुरी दिली आहे. यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. याबरोबरच शिरोळ तालुक्‍याला ३१, हातकणंगले ३०, शाहूवाडी १६, पन्हाळा ३०, शिराळा २० अशा पाणी योजना मंजूर केल्या आहेत. केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्याकडे महाराष्ट्रासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यात त्यांनी सहा हजार पाणीपुरवठा योजनांना निधी दिला आहे. आम्ही मंजूर करून आणलेल्या योजनांचे क्रेडिट घेणाऱ्या ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांनी यापूर्वी ते मंत्री असताना निधी का आणला नाही? मी ज्या खात्याचा राज्यमंत्री आहे, त्या खात्याचा निधी तालुक्‍यात दिल्यावर सोशल मीडियावर श्रेय घेण्यासाठी काही मंडळी सरसावली आहेत. मात्र, त्यांच्या कासेगावातील पाणीपुरवठा योजनेला मला निधी द्यावा लागला. या उपर मी बोलणे योग्य नाही.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ज्या-ज्या गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, त्या-त्या गावांत मी निधी देण्याचा प्रयत्न करतोय. चळवळीच्या माध्यमातून या मतदारसंघात फिरताना तेथील सर्वसामान्य जनतेला काही आश्‍वासने दिली होती. त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न आहे. वाळवा तालुक्‍यातील छोट्याशा लोणारवाडीला ४० लाख रुपये पाणी योजनेसाठी दिले आहेत.

आता श्रावणबाळ असल्याचा आव
ते म्हणाले, की मराठा आरक्षण देण्यासाठी भाजपचे सरकार विशेष प्रयत्न करीत आहे. या संदर्भात सरकारने योग्य त्या हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वेळेला निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दिलेले आरक्षण न्यायालयात टिकले नाही. ते सर्व टाळण्यासाठी योग्य पद्धतीने सरकार मराठा आरक्षणाबाबत पाऊले उचलत आहे.

काँग्रेस-‘राष्ट्रवादी’तील मूठभर नेत्यांनी सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवून संस्थानिक होत समाजाला गरीब ठेवले. चारही बाजूंनी मराठा समाजाची कोंडी करीत सत्ता भोगली व आता श्रावणबाळ असल्याचा आव आणत आहेत. लवकरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल.’’

Web Title: Minister Sadabhau Khot comment