राजु शेट्टी कुटनितीचा महामेरू - सदाभाऊ खोत

शांताराम पाटील 
सोमवार, 1 एप्रिल 2019

शेट्टींनी साखर कारखानदार व राष्ट्रवादीच्या नेत्याच्या गळ्यात गळा घालून आपली उमेदवारी घोषीत  केली. हे करताना सर्वसामान्य शेतकरी व कार्यकत्यांना विचारात घ्यायला हवे होते. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र लोकांना न विचारता त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. त्यांच्यासारखा दलबदलू माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही.

- सदाभाऊ खोत, राज्यकृषीमंत्री

इस्लामपूर -  खासदार राजू शेट्टी याच्या सारखा पाताळयंत्री व कुटनितीचा महामेरु शोधून सापडणार नाही. मला त्यांचा गेल्या दहा वर्षांचा अभ्यास आहे, अशी टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली.  त्यांच्यासारखा दलबदलू माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही. प्रत्येक वेळी वेगळी भूमिका घेऊन ते सहकाऱ्यांना तोंडावर पाडतात. भविष्यात ते राष्ट्रवादीसोबत राहणार नाहीत, असेही श्री. खोत म्हणाले.

श्री. खोत यांनी आज इस्लामपूर येथे बैठक घेतली. यावेळी शिवसेनेचे हातकणंगले मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार धैर्यशील माने, वनश्री नानासाहेब महाडिक, आमदार उल्हास पाटील, सी. बी.पाटील, विक्रम पाटील, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार, राहुल महाडिक, सम्राट महाडिक उपस्थित होते.

श्री. खोत म्हणाले, खासदार शेट्टींनी लोण्याचा गोळा खाण्यासाठी स्वाभिमानी व काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांच्यात यापूर्वी जोरदार भांडणे लावली. यातूनच त्यांनी आपला मतलब साधला.
त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या व साखर कारखानदारांच्या गळ्यात गळा घातलेल्या शेट्टींना वाळवा- शिराळ्यातील कार्यकर्ते योग्य जागा दाखवतील. 

शेट्टींनी साखर कारखानदार व राष्ट्रवादीच्या नेत्याच्या गळ्यात गळा घालून आपली उमेदवारी घोषीत  केली. हे करताना सर्वसामान्य शेतकरी व कार्यकत्यांना विचारात घ्यायला हवे होते. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र लोकांना न विचारता त्यांनी राष्ट्रवादीशी युती केली. त्यांच्यासारखा दलबदलू माणूस मी आयुष्यात पाहिलेला नाही.

- सदाभाऊ खोत, राज्यकृषीमंत्री

श्री. खोत म्हणाले,  त्यांनी आता निवडणुकीसाठी पैसे मागायचे ढोंग करू नये. ते पैसेवाल्यांच्या बरोबर पैशाच्या ढिगाऱ्यात बसले आहेत. त्यांचे मन साफ नाही. संघटनेच्या लोकांना वापरून फेकून देणे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. खोटे फार काळ लपून राहत नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात त्यांची चाल लोकांच्या लक्षात आली आहे. यावेळी ते कारखानदारांच्या गळ्यात गळा घालून बसल्याने त्यांचा पराभव निश्चित आहे.

विकास आघाडीतील नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या अनुपस्थिबद्दल श्री. खोत यांना छेडले असता ते म्हणाले, आमची विकास आघाडी म्हणजे बारा बैलांच्या नांगरा सारखी आहे. औत ओढताना एखादा बैल मागे पुढे बाजूला चालतो. मात्र सर्वजण शेत नांगरण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे आमच्यातील एखादा इकडे-तिकडे असला तरी शिवसेनेचे धेर्यशील मानेंना निवडून आणण्याचे काम ते करणार यात शंका नाही.

 

Web Title: Minister Sadabhau Khot comment