Vidhan Sabha 2019 : सहकारमंत्र्यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

- महायुतीचे नेते उपस्थित
- रॅली टाळून घेतला विजय संकल्प मेळावा

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून आज (ता.03) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याऐवजी त्यांनी आज विजय संकल्प मेळावा घेतला. उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीचे नेते उपस्थित होते.

सहकारमंत्री देशमुख दुपारी एकच्या सुमारास आपला अर्ज दाखल करण्यासाठी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात आले. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, भाजपचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, रिपाईचे तालुकाध्यक्ष ऍड. सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह काही कार्यकर्ते उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे अर्ज दाखल करताना उमेदवारांसह केवळ पाच जणांना प्रवेश देण्यात आला होता. उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Subhash Deshmukh has filed his nomination form